द्वेष पसरवणाऱ्यांचे मूळ शोधा

कुठल्याही धर्माचे लोक असोत, जर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून गोव्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कारस्थान करण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते योग्य वेळी हाणून पाडण्याची गरज आहे.

Story: संपादकीय |
10 hours ago
द्वेष पसरवणाऱ्यांचे मूळ शोधा

गोव्यात क्षुल्लक कारणांवरून धर्म पुढे करून जो-तो मोर्चे काढत असतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असतात. कोणी पॅलेस्टीनचा झेंडा फडकवतो, तर कोणी पोर्तुगालचा. कोणी मुस्लिम धर्मीयांना टोमणे मारतो, तर कोणी रात्रीच्या काळोखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना करतो. कोणी समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करतो तर कोणी दुसऱ्याचा धर्म कसा लहान, ते दाखविण्यासाठी धडपडतो. गोव्यात गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यातून गोव्याची शांतता भंग करण्याचे प्रयत्न झाले. दोन धर्मांमध्ये दुफळी निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. आपल्या धर्माला मोठे करण्याच्या नादात दुसऱ्या धर्माला लहान दाखविण्याचे प्रयत्न करताना काहीजण दुसऱ्या धर्माचे देव, महान व्यक्तींविषयी अपशब्द वापरून दुसऱ्या धर्माला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. एक-दोनदा नव्हे, तर अनेकदा. पण एका धर्माचे लोक जमतात म्हणून आपल्यावरही मोठा अन्याय झाल्याचे भासवून दुसऱ्या धर्माचेही लोक पोलीस स्थानकांवर जमा होण्याचे कित्येक प्रकार गोव्यात घडले.

गोव्यात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम या धर्मांतील लोकांसह अन्य धर्मांतील लोकही गुण्यागोविंदाने राहतात. पोर्तुगीज काळातही गोव्यातील एकता, इथला सर्वधर्म समभाव कधी ढळला नाही. तसे प्रयत्न अनेक झाले असले तरी मूळ गोंयकार कधीच एकमेकांच्या विरोधातील वाद विकोपाला घेऊन गेला नाही. एक-दोन घटना गोव्यातही घडल्या आहेत, पण पोलिसांनी त्या त्वरित नियंत्रणात आणल्या. गोव्यात गेल्या काही वर्षांपासून मात्र वारंवार धर्माच्या नावाने इथली शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे की काय, असा संशय येतो. कारण पुन्हा पुन्हा एकमेकांच्या धर्माविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या करून, एकमेकांच्या धार्मिक चिन्हांची विटंबना करून हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांना एकमेकांच्या समोर उभे केले जाते. एखाद्या अज्ञानी व्यक्तीने चूक केली तरीही संपूर्ण प्रकरणाला धार्मिक रंग देऊन त्याचा बाऊ केला जातो. या साऱ्या गोष्टी मुद्दामहून द्वेष पसरविण्यासाठी किंवा गोव्यातील एकता भंग करण्यासाठी होत असाव्यात, असा संशय येणे साहजिक आहे. कुठल्या तरी एखाद्या वाड्यावर एखाद्याने दुसऱ्या धर्मीयाला दुखवले तरीही त्या गोष्टीचे राजकारण करून मोर्चे जमवले जातात. एकाच धर्मात हे घडते असेही नाही. गोव्यात तर हल्ली हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मात अनेकदा असे प्रकार घडू लागले आहेत. संवेदनशील गोंयकार असे वागत नव्हते. पण हल्लीच्या काळात स्थलांतरितांचे मोठ्या प्रमाणात गोव्यात आगमन झाले आणि स्वतःला असुरक्षित मानणाऱ्या काही लोकांमुळे बारीकसारीक गोष्टींवरून समाजाला, धर्माला एकत्र बोलावण्याचे आणि मोर्चे काढून प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. एखाद्या व्यक्तीला काही म्हटले तर त्या व्यक्तीशीच त्याचा संबंध यायला हवा. त्यात संपूर्ण धर्माला ओढून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत. हिंदू, मुस्लिमांच्या सणांवेळी असे प्रकार हल्ली पुन्हा पुन्हा घडू लागले आहेत. प्रक्षोभक भाषणे करून लोकांना चिथावून घालणे, एका धर्माच्या लोकांनी मोर्चा काढला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या धर्माच्या लोकांनी शक्तिप्रदर्शन करणे, हे प्रकार गोव्याच्या शांततेला बाधक आहेत. गोव्याच्या धार्मिक सलोख्यामुळे जगाच्या नकाशावर गोव्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळे गोव्याच्या धार्मिक सलोख्याला आव्हान देण्याचे काम करणाऱ्यांना पोलीस व्यवस्थेने योग्य धडा शिकवायला हवा. उठसूठ रस्त्यांवर येणाऱ्यांना आणि दोन धर्मांमध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. गोव्यात पुन्हा पुन्हा धर्माच्या नावाने लोक रस्त्यावर उतरण्याचे धाडस का करतात? हे करण्यासाठी कोणाकडून खतपाणी घालले जाते का? तेच तेच लोक पुन्हा पुन्हा सर्व ठिकाणी कसे पोहचतात? त्यांचा हेतू काय? या साऱ्या गोष्टींची पोलिसांनी योग्य चौकशी करावी. जे घडते ते शांत झाल्यावर पोलिसांचे काम संपत नाही. हे पुन्हा पुन्हा का होते? काही व्यक्ती नेहमी अशा मोर्चाच्या ठिकाणी कसे येतात? त्याचा तपास व्हायला हवा. कुठल्याही धर्माचे लोक असोत, जर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून गोव्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कारस्थान करण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते योग्य वेळी हाणून पाडण्याची गरज आहे.