बाप्पाला निरोप देताना काळ आला अन्...: मुलाला वाचवताना पित्याचा बुडून मृत्यू झाला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
बाप्पाला निरोप देताना काळ आला अन्...: मुलाला वाचवताना पित्याचा बुडून मृत्यू झाला

छत्रपती संभाजीनगर: गणेश विसर्जनाचा सोहळा म्हणजे उत्साह, आनंद आणि भक्तीचा संगम. पण याच मंगलमय वातावरणात शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या ११ वर्षांच्या मुलाला बुडण्यापासून वाचवताना एका पित्याला आपले प्राण गमवावे लागले.

सुधीर काशीनाथ मेणे (वय ४८) हे घाटी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. ड्युटीवर जाण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांसह पोखरी तलावात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले. विसर्जन झाल्यानंतर ते आपल्या मुलासोबत तलावाशेजारीच होते. त्याचवेळी दुर्दैवाने त्यांच्या ११ वर्षीय मुलाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडून बुडू लागला.

क्षणभरही विचार न करता, सुधीर यांनी तातडीने पाण्यात उडी घेतली आणि मुलाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवला व त्याला तलावाच्या किनारी आणले खरे, पण पाण्यातून वर येताना त्याच क्षणी त्यांचा स्वतःचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही आणि पाहता पाहता ते दिसेनासे झाले.

स्थानिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलासाठी धावलेल्या पित्याच्या या बलिदानाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुधीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे. गणेशोत्सवाच्या आनंदात अशाप्रकारे अचानक दुःखाचा प्रसंग ओढवल्याने अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेची सिडको पोलीस स्थानकात नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा