भारतात ३ तास २८ मिनिटे दिसले ग्रहण
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : शंभर वर्षांतील सर्वात मोठे चंद्रग्रहण रविवारी रात्री पहायला मिळाले. हे पूर्ण चंद्रग्रहण नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनऊ यासारख्या शहरांमध्ये दिसले.
हे पूर्ण चंद्रग्रहण ही २०२५ मधील लक्षवेधी खगोलीय घटना ठरली. वर्षातील हे अखेरचे चंद्रग्रहण होते. देशवासीयांना वर्षातील सर्वांत मोठी खगोलीय घटनेचा अनुभव घेता आला. रविवारी रात्री ९.५८ वा. सुरू झालेले ग्रहण देशभरात दिसले. भारतासह जगातील अनेक भागात हे ग्रहण दिसले. विशेष म्हणजे ग्रहणादरम्यान चंद्राचा रंग काळा किंवा निळा नाही, तर लाल होता. म्हणूनच याला ‘ब्लड मून’ म्हटले गेले. भारतात हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता आले. पृथ्वीने चंद्राला पूर्णपणे झाकून टाकले, तेव्हा ‘ब्लड मून’चे दृश्य दिसले.
भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ९.५८ वा. सुरू झालेले हे ग्रहण सोमवारी पहाटे १.२६ वा संपले. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास २८ मिनिटे होता. रात्री ११ ते १२.२२ या वेळेत हे चंद्रग्रहण भारतात सर्वांत लाल आणि तेजस्वी दिसले.
मृत्यू पंचक आणि चंद्रग्रहण
ज्योतिषांच्या मते, पितृपक्ष चंद्रग्रहणाने सुरू झाल्याचा योगायोग सुमारे १२२ वर्षांनंतर घडला आहे. हे ग्रहण पंचक दरम्यान झाले आहे. मृत्युपंचक ६ सप्टेंबरपासून सुरू झाले. ते १० सप्टेंबरपर्यंत चालू राहील. हिंदू धर्मात मृत्युपंचक आणि चंद्रग्रहण या दोन्ही काळांना अशुभ मानले जाते. या काळात पूजा, लग्न, गृहप्रवेश, मुंडन इत्यादी काम केले जात नाही.
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण
रविवारी झालेले हे ग्रहण या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होते. पहिले चंद्रग्रहण १४ मार्च रोजी झाले होते, जे भारतात दिसले नाही. यानंतर वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. तथापि, हे ग्रहण भारतात दिसणार नाही.
चंद्रग्रहणाचे विशेष
चंद्रग्रहण रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झाले. रात्री १ वाजून २६ मिनिटांनी समाप्त झाले. ग्रहणाचा स्पर्शकाळ रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी होता. ग्रहणाचा मध्य रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी होता. ग्रहणाचा मोक्ष रात्री २ वाजून २४ मिनिटांनी झाला. संपूर्ण देशात हे ग्रहण सुमारे ३ तास २८ मिनिटे दिसले.