कुटुंबाने आरोग्य व्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न
पणजी : काणकोणमध्ये सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेले आगस माशें येथील नंदा विठ्ठल सतरकर यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांना ज्या आरोग्य केंद्रांमध्ये नेले तिथे त्यांच्या पायाला कसला दंश झाला याचेच निदान झाले नसल्यामुळे ‘ॲंटी वेनम’ औषध देण्याचे सर्वांनी टाळले. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे त्यांना गोमेकॉत नेण्यात आले. तिथे ॲंटी वेनम देण्यात आले पण तो पर्यंत फार उशीर झाला होता. शेवटी ४० तासांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या साऱ्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाने आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांची सून नेहा आमोणकर यांनी फेसबुकवर लिहिलल्या दीर्घ पोस्टमध्ये आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.
‘२ सप्टेंबर २०२५ रोजी आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ — आमचे लाडके बाबा नंदा सातरकर यांना पीएचसी काणकोण, दक्षिण गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि जीएमसीच्या निष्काळजीपणामुळे आम्ही गमावले’ असा दावा त्यांनी पोस्टमंध्ये केला आहे.
‘ ही शोकांतिका ३० ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली. अंगणात काहीतरी चावल्यामुळे बाबांच्या पायाला सूज आसी आणि तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना वाटले मुंगीनं चावले असेल, पण सूज आणि वेदना झपाट्याने वाढू लागल्या. अवघ्या दोन तासांत आम्ही त्यांना पीएचसी काणकोण येथे नेले. तपासणी करून विषारी लक्षणे दिसूनही त्यांनी फक्त एवढेच सांगितले की ‘चावा ओळखता येत नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांना ॲंटी वेनम (Anti-venom) देऊ शकत नाही’.
यानंतर त्यांना दक्षिण गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला रेफर केले. पण तेव्हा चाव्याला आधीच चार तास उलटले होते. तेथे त्यांना दाखल केले गेले, मात्र तरीही ॲंटी वेनम दिले गेले नाही. त्यांनी फक्त दर ४ तासांनी रक्त गोठण्याची तपासणी केली, जी नेहमीसारखीच येत होती. तब्बल १८ तास ॲंटी वेनम न दिल्यामुळे परिस्थिती बिघडत गेली. लघवी बंद झाली, लक्षणे गंभीर होत गेली, तरीही काहीच केले गेले नाही’ असे नेहाने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
‘शेवटी आम्ही हताश होऊन बाबांना जीएमसीत नेले. तिथे ॲंटी वेनम दिले गेले, पण तोवर चाव्याला ३८ तास उलटून गेले होते. उशीर झाला होता. पुढील २ दिवसांत आम्ही त्यांना गमावले. जीएमसीतही सुरुवातीला उपचार जलद झाले, पण कनिष्ठ डॉक्टरांचा बेफिकीर दृष्टीकोन आणि गंभीर लक्षणांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे बाबांचा मृत्यू झाला’ नेहाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘आज मी त्या सर्व आरोग्यकर्मचाऱ्यांना विचारते, जर तुमच्या घरच्या व्यक्तीला असा चावा झाला असता, तर तुम्ही अशा पद्धतीने दुर्लक्ष केले असते का? वैद्यकीय शिक्षण घेताना तुम्हाला शिकवले जात नाही का, की चावा अज्ञात असेल तर धोका जास्त आणि तातडीने उपचार गरजेचे असतात? फक्त ‘क्लॉटिंग टेस्ट’ करत बसणे ही कर्तव्यपूर्ती होती का? पायाची सूज आणि लघवी थांबणे हे गंभीर लक्षण नव्हते का? असे प्रश्न तिने उपस्थित केले आहेत.
‘आमच्या प्रिय बाबांना तुमच्या निष्काळजीपणामुळे आम्ही गमावले. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांच्यासोबत गणेशोत्सव साजरा केला आणि आज त्यांच्या जाण्याचा शोक करत आहोत. हा दु:खद धक्का आम्ही कधी विसरू शकणार नाही. जर तुम्हाला जीव वाचवण्याचे कर्तव्य पार पाडता येत नसेल, तर स्वतःला आरोग्यरक्षक म्हणवू नका. तुमच्या उशिरा केलेल्या उपचारांमुळे, तुमच्या निष्क्रियतेमुळे आणि निष्काळजीपणामुळेच आम्ही आमचे बाबा गमावले’ नेहा आमोणकर हिने अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
नंदा सतरकर हे काणकोणच्या निराकार शिक्षण संस्थेचे खजीनदार. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.