ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुपारी उत्पादक शेतकऱ्ऱ्यांची मागणी

वाळपई : गोव्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ 'ओला दुष्काळ' जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. विशेषतः सुपारी, नारळ आणि काजूच्या पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून पाऊस सतत पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः सुपारी उत्पादकांना मोठा फटका बसला. पावसामुळे झाडांवर औषध फवारणी करता न आल्याने सुपारीची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या हंगामात ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन घटल्याचे सुपारी उत्पादकांचे म्हणणे आहे. सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड होते, मात्र या पावसामुळे सुपारी उत्पादक संकटात सापडले आहेत.
सततच्या पावसामुळे केवळ जुन्या पिकांचेच नाही, तर नवीन लागवडीचेही नुकसान झाले आहे. नव्याने लावलेली सुपारी आणि काजूची रोपे कुजली आहेत. सपाट जमिनीवर लावलेल्या रोपांच्या मुळाशी पाणी साचल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काजू उत्पादकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याचप्रमाणे नारळाच्या झाडांवरूनही फळे गळत असल्याने नारळ उत्पादक चिंतेत आहेत.
हवामानातील बदलांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने सरकारने त्यांना आधार देणे आवश्यक आहे. त्यामुळे, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक पिकाच्या नुकसानीनुसार विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शासनाने या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.