भिवंडी : तब्बल दहा महिने पोलिसांना चकवणारा खुनाच्या प्रकरणातील एक आरोपी अखेर गजाआड झाला. मोबाईल बंद ठेवणे, वारंवार ठिकाण बदलणे, कधी उत्तर प्रदेश तर कधी मध्य प्रदेशात आश्रय घेणे... अशा फिल्मी स्टाईलने तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. मात्र, त्याच्या हातावर गोंदवलेला टॅटूने अखेर त्यांचे बिंग फोडले आणि अखेर पोलिसांनी त्याला इंदूरमधून बेड्या ठोकल्या.
आरोपीचे नाव राजू महेंद्र सिंह असून तो उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचा रहिवासी आहे. २०२४ मध्ये प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादात त्याने एका महिलेची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर तो फरार झाला. दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी राजू सतत आपले ठिकाण बदलत राहिला. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात लपला, तर कधी मध्य प्रदेशात आसरा घेतला. त्याच्याकडे मोबाईल फोनही नव्हता, त्यामुळे त्याचा माग काढणे अधिक कठीण झाले.
शेवटी शांतीनगर पोलिसांना राजू इंदूरच्या देवास नाका भागात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर इंदूर गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. या वेळी आरोपीने स्वतःचं नाव ‘सूरज’ असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या हातावरील टॅटूमुळे पोलिसांना संशय आला आणि खरी ओळख समोर आली.
अटकेच्या वेळी राजूने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण पोलिसांच्या तयारीसमोर त्याचे सर्व डाव फसले. त्याला भिवंडीत आणण्यात आले असून न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.