एअर इंडियाचा ‘यू-टर्न’; गोवा ते लंडन-गॅटविक थेट विमानसेवा पुन्हा रद्द

अमृतसर आणि अहमदाबाद येथील प्रवशनची संख्या जास्त तर गोव्यात पर्यटन हंगामावर सर्वकाही अवलंबून, म्हणून नफ्याला दिले प्राधान्य.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th September, 02:14 pm
एअर इंडियाचा ‘यू-टर्न’; गोवा ते लंडन-गॅटविक थेट विमानसेवा पुन्हा रद्द

पणजी: एअर इंडियाने गोवा आणि लंडन-गॅटविक दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा एकदा रद्द केली आहे. याआधी ही सेवा २६ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार होती आणि त्यासाठी बुकिंगही सुरू करण्यात आले होते. मात्र, आता हे बुकिंग थांबवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाला धक्का बसला असून प्रवाशांचीही मोठी गैरसोय होणार आहे.

एअर इंडियाने आपल्या हिवाळ्यातील (२०२५-२६) वेळापत्रकातून गोव्याला वगळले आहे. या वेळापत्रकात लंडन-गॅटविकसाठी अमृतसर आणि अहमदाबादची विमानसेवा कायम ठेवण्यात आली आहे. सूत्रांनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय मार्गांवरच्या मोठ्या विमानांच्या (wide-body aircraft) संख्येत १५% कपात केली आहे. याचा फटका गोवा-लंडन मार्गाला बसल्याचे दिसते.

या निर्णयामागे व्यावसायिक कारणेही असल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाने ज्या मार्गांवर वर्षभर सातत्याने चांगली मागणी आहे, अशा मार्गांना प्राधान्य दिले आहे. अमृतसर आणि अहमदाबाद येथून मित्र, कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. याउलट, गोव्यातील पर्यटन हंगामानुसार मागणी कमी-जास्त होते. त्यामुळे, नफ्याला प्राधान्य देत एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

याआधी, गोवा-लंडन विमानसेवा जूनमध्ये थांबवण्यात आली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि खासदार सदानंद तानवडे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना पत्र लिहून ही सेवा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. अनेक गोमंतकीय नागरिक नोकरीनिमित्त किंवा इतर कामांसाठी लंडनला ये-जा करतात, त्यामुळे ही सेवा महत्त्वाची असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. मात्र, आता एअर इंडियाच्या ताज्या निर्णयामुळे प्रवाशांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.

हेही वाचा