हरियाणा : प्रेम, लग्न, त्याग आणि विश्वास… पण अखेरीस विश्वासघात! असाच एक धक्कादायक प्रकार हरियाणाच्या पलवलमध्ये उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील बहुचर्चित एसडीएम ज्योती मौर्या–आलोक मौर्या प्रकरणाची आठवण करून देणारी ही कहाणी आता चर्चेचा विषय ठरत आहे.
पलवलच्या बडोली गावातील पीतम (२६) याने २०२१ मध्ये सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लायब्ररी सुरू केली होती. याच लायब्ररीत त्याची ओळख राजीव नगरमधील एका मुलीशी झाली. हळूहळू ओळख प्रेमात बदलली आणि ४ जानेवारी २०२३ रोजी दोघांनी बल्लभगढ येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले. लग्नानंतर दोघंही एका फ्लॅटमध्ये राहू लागले.
दरम्यान, पत्नीने दिल्ली पोलिसात भरतीसाठी अर्ज केला. तिचे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून पीतमने सर्वस्व पणाला लावले. तिने शिक्षण आणि तयारीसाठी पीतमने स्वतःची लायब्ररी आणि थोडीफार जमीन विकली. एवढंच नाही तर परीक्षेपासून फिजिकल टेस्टपर्यंत तिला त्यानेच मार्गदर्शन केले. फेब्रुवारी २०२४ मध्ये पत्नीची दिल्ली पोलिसात निवड झाली आणि तिला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.
पण इथूनच नात्यात कटू वळण आले. पीतमच्या आरोपानुसार, पत्नीने प्रशिक्षणादरम्यान अधिकृत कागदपत्रांत स्वतःला ‘अविवाहित’ असल्याचं दाखवले. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रशिक्षण पूर्ण होताच ती थेट माहेरी परतली आणि पतीशी सर्व संपर्क तोडला. पीतम तिला आणण्यासाठी गेला असता, तिच्या कुटुंबीयांनी लग्न मान्य नसल्याचे कारण देत पाठवण्यास नकार दिला. पत्नीनंही त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला.
या धक्क्यानंतर पीतमने न्यायासाठी धाव घेतली आहे. त्याने हरियाणाचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि दिल्ली पोलिस आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यात पत्नीने लग्न लपवून फसवणूक केल्याचा उल्लेख आहे. तसेच, पत्नीवर पुन्हा सहजीवनासाठी दबाव आणण्यासाठी त्याने कोर्टातही याचिका दाखल केली असून, सेक्शन ९ अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.