साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

गणरायाला भावपूर्ण निरोप तर, ईडीच्या छाप्यांनी अनेकांच्या मनात धडकी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th September, 12:18 am
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : ढोलताशांच्या गजरात ११ दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. या आठवड्यात सर्वत्र गणेशभक्तांचा उत्साह दिसून आला. म्हापशात दुकान फोडले, कुंकळ्ळी आयडीसीत भीषण आग लागून कंपनीचे लाखोंचे नुकसान, अपघाताच्या घटना तर, ईडीच्या छाप्यांनी अनेकांच्या मनात धडकी भरवली. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार


पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात रविवारी राज्यभरात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गोव्यात बहुतांश घरांमध्ये दीड आणि पाच दिवसांचे गणपती असल्याने घरगुती गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांमुळे रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून आली.

विजेचा धक्का लागून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

झुआरीनगर येथे एका १२ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. घरातील फ्रिजखाली गेलेला चेंडू काढण्याचा प्रयत्न करत असताना मुस्ताग अहमद सुरनागी याला विजेचा धक्का बसला. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

म्हापशात दुकान फोडले

म्हापसा येथील वामन सदन इमारतीमधील ‘सेलटाऊन रबर स्टॅम्प’ नावाचे दुकान फोडून सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत अवघ्या काही तासांत महादेव पापा गोसावी (२५, रा. कर्नाटक) या संशयिताला अटक केली आहे.

सोमवार

कुंकळ्ळी आयडीसीत भीषण आग; कंपनीचे लाखोंचे नुकसान

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील (आयडीसी) मे. परशुराम मेटॉक्स प्रा. लि. कंपनीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत कंपनीतील पेपर आणि रॉकवूलचा मोठा साठा जळून खाक झाला असून, काही यंत्रसामग्रीचेही नुकसान झाले आहे. या आगीमुळे कंपनीची लाखोंची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कोलवा येथे घरफोडी, दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला

कोलवा येथील सेवेरीनो फर्नांडिस यांच्या घराचे मागील दार फोडून चोरी करण्यात आली. यात सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, विदेशी चलन, रोख रक्कम असा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. कोलवा पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.

कुटबण येथील कामगाराचा मृत्यू

कुटबण येथील कामगार रुसुराज राठ (३७, रा. बेतुल, मूळ ओडिशा) याचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कुंकळ्ळी पोलिसांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून कुटबण येथील कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

मंगळवार

सत्तरी तालुक्याला संततधार पावसाचा फटका

गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. होंडा वडदेव नगर येथील भालचंद्र पांडुरंग गावडे यांच्या घरावर सुपारीचे झाड पडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसानी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे ६० हजार रुपयांची मालमत्ता वाचविली.

पणजीतील बसेरा रेस्टॉरंट, डॉर्मिटरी सील

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (जीएसपीसीबी) व्यवसाय सुरू करण्याचा परवाना नसल्यामुळे कांपाल येथील बसेरा रेस्टॉरंट आणि डॉर्मिटरी सील करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी तिसवाडी मामलेदारांच्या निर्देशानुसार, तलाठीने केली.

ईडीचे गोवा, तामिळनाडू, प. बंगालमध्ये छापे

पंजाब नॅशनल बँकेसह अनेक मोठ्या बँकांची ६३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तामिळनाडू येथील अरविंद रेमेडीज लिमिटेडविरुद्ध गोव्यासह तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे मोठी कारवाई सुरू केली आहे.


खोतीगाव येथे वड कोसळून रस्ता बंद

खोतीगाव काणकोण येथे वड कोसळून रस्ता बंद झाला. काणकोण ग्रामपंचायत हद्दीतील कुस्के येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळ वड पडला. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे यामुळे नुकसान झाले नाही. परंतु गावातील रस्ता जवळजवळ तीन तास बंद होता.

बुधवार

महिलेला बेशुद्ध करून मंगळसूत्र लंपास

पालवाडा उसगाव येथे घरातील महिलेला बेशुद्ध करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कपाटातील रोख रक्कम घेऊन दोन चोरट्यानी पोबारा केला. घरात कोणीतरी आले असल्याचा सुगावा लागताच शीतल गावडे सावध झाल्या. मात्र त्या काही करण्यापूर्वीच चोरांनी त्यांना पकडले व बेशुद्ध केले. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कपाटातील रोख रक्कम घेऊन चोर तिथून पसार झाले.


म्हापसा बाजारपेठेत आग

म्हापसा येथील बाजारपेठेतील मेसर्स मालसन्स शूज दुकानाचा भाग असलेल्या डिल्नस कलेक्शन मेन्स अॅण्ड किडस् वेअर या दुकानाला आग लागून अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. म्हापसा अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मेरशी येथे घरफोडी करणाऱ्या कुडाळच्या सराईत चोराला अटक

पेरीभाट - मेरशी येथे घरफोडी करून १० लाख रुपयांचे दागिने व इतर वस्तू चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ - महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला अटक केली आहे.

अटालाची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश

जामीन मंजूर झालेल्या कुख्यात ड्रग्ज डीलर आणि इस्रायली नागरिक यानिव्ह बेनाहिम उर्फ अटाला याला त्वरित सुटका करा असा आदेश मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. तसेच या संदर्भात २४ तासात कृती अहवाल न्यायालयात सादर करा, असा निर्देश विदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी कार्यालयाचे (एफआरआरओ) अधीक्षक अर्शी आदिल यांना न्यायालयाने दिला आहे.

गुरुवार

बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या

बिट्स पिलानी कॅम्पस पुन्हा एकदा हादरले. बंगळुरू येथे राहणारा व हैद्राबाद कॅम्पसहून गोवा कॅम्पसमध्ये नुकताच दाखल झालेला ऋषी नायर (२०) हा विद्यार्थी आपल्या हॉस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. काही महिन्यांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कुशाग्र जैनच्या मृत्यूबाबतची चर्चा थांबायच्या आतच घडलेल्या या घटनेमुळे कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रसुतीदरम्यान निष्काळजीपणा; म्हापसा खासगी इस्पितळातील डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा

प्रसुतीनंतर कोठंबी-पाळी, डिचोली येथील महिलेच्या मृत्यूसाठी म्हापसातील एका खासगी इस्पितळातील डॉक्टर्सना जबाबदार धरण्यात आले आहे. २० महिन्यांपूर्वी बेजबाबदारपणा व निष्काळजीपणामुळे इस्पितळात ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

शुक्रवार

सोनाराच्या घरी ईडीचे छापे

बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या सोन्याचा दर्जा तपासणाऱ्या विश्वासार्ह सोनारानेच बँकेला चुना लावल्याची घटना घडली. सोन्याचे भासवून बनावट दागिने तारण ठेवून युको बँकेची तब्बल २.६३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बँकेचा सोनार हेमंत रायकर (रा. कोलवा) आणि गुंडू यल्लपा केलवेकर (रा. मुगाळी-सां जुझे द आरियल) यांच्या घरांवर छापा टाकला.

२९.२४ कोटींच्या १५ मालमत्ता हडपप्रकरणी संबंधितांना ईडीकडून नोटीस

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहन हरमलकर याच्याशी संबंधित २१२.८५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. त्यातील २९.२४ कोटी रुपयांच्या १५ मालमत्ता न्यायालयाकडून इन्व्हेंटरी प्रोसिडिंग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने नोटीस जारी करून संबंधितांना १५ दिवसांत दावा करण्यास सांगितले आहे.

शनिवार

कोलवाळ कारागृहात गुन्हा शाखेकडून छापा

कोलवाळ कारागृहात गुन्हा शाखेकडून छापा टाकण्यात आला. छाप्यात आठ मोबाईल व काही ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तुरुंग प्रशासनाच्या सूचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू आरोग्याकडे दुर्लक्षामुळे

बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू आरोग्याकडे दुर्लक्ष तसेच झोपेत असताना झालेल्या उलटीमुळे श्वास गुदमरून झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी डिप्रेशनवरील औषधे घेत होता. बिट्स पिलानीत झालेल्या ५ मृत्यूंपैकी ३ प्रकरणे ही आरोग्याकडे दुर्लक्षामुळे झाली, असे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी सांगितले.

लक्षवेधी

ग्राहकांना वेळेत फ्लॅट न देणाऱ्या ‘एक्सपॅट प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपर्स’ या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दणका दिला. तिसवाडी मामलेदाराला कंपनीची बायगिणी येथील ७.२३ कोटी रुपयांची मालमत्ता (सात फ्लॅट व एक भूखंड) आठवड्याभरात जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दोन ग्राहकांना तीन महिन्यांत १.२९ कोटी रुपये देण्याचे निर्देशही कंपनीला दिले आहेत.

हॉस्पेट-हुबळी-तीनईघाट-वास्को या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी रेल्वे मंत्रालय मुरगाव तालुक्यात आणखी ६ हजार चौ.मी. जमीन संपादित करणार आहे. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली असून, हरकती नोंदवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.

गिरकरवाडा-हरमल येथील विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभारण्यात आलेल्या बांधकाम संदर्भात प्रलंबित असलेल्या कारणे दाखवा नोटीस सहा महिन्यांत निकालात काढा. याशिवाय राज्यातील अन्य बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली नसल्यास संबंधित पंच सदस्याला काढून टाकण्याची कारवाई करा, असा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने पंचायत संचालनालय, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला (जीसीझेडएमए) दिला आहे. 

हेही वाचा