जीएसटी सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार !

मुख्यमंत्री : भारताला जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल


17 hours ago
जीएसटी सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जीएसटीमधील नवीन सुधारणांमुळे सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे. उद्योग संघटनांनी नवीन बदलांबाबत लोकांना माहिती द्यावी. राज्यातील जीएसटी कार्यालयातर्फेही यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (जीसीसीआय) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, कर आयुक्त एस. एस. गील उपास्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नवीन बदलांमुळे सुरुवातीला राज्याचा महसूल काही प्रमाणात कमी होईल. मात्र लांब पल्ल्याचा विचार करून लोकांना फायदा होण्यासाठीच हे बदल करण्यात आले आहेत. गोव्याचा विचार करता कृषी, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, एमएसएमई, निर्यातदार, फार्मा कंपन्या, तसेच छोट्या उद्योजकांना नव्या बदलांमुळे फायदा होणार आहे. आरोग्य, विमा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील काही गोष्टींसाठी जीएसटी शून्य केला आहे. याचाही जनतेला लाभ होणार आहे.
ते म्हणाले, जीसीसीआयप्रमाणे अन्य उद्योग संघटनांनी एकत्र येऊन नवीन बदल लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी माध्यमांचा वापर करावा. सरकार उद्योग क्षेत्राला सर्वतोपरी मदत करत आहे. सरकारी पातळीवर पारदर्शकता आणली जात आहे. जीएसटीमधील नवीन बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे बदल भारताला जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
जीएसटी नोंदणी करा
गिल यांनी सांगितले की, राज्यातील पर्यटन , हॉस्पिटॅलिटी, तसेच अन्य क्षेत्रांतील उद्योजकांनी पुढे येऊन जीएसटी नोंदणी करणे आवश्यक आहे. संघटनेच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे फायदे समजावून सांगावेत. भविष्यात नवीन जीएसटी बदलांचा उद्योगांना फायदा होणार आहे.
राज्य सरकारवरील भार कमी होणार
मुख्यमंत्री म्हणाले की, जुन्या जीएसटी नियमानुसार आरोग्य विम्यावर जीएसटी लागू होता. राज्यातील बहुतेक लोक डीडीएसएसवाय योजनेचा लाभ घेतात. असे असले तरी त्यांना यावरील जीएसटी शुल्क भरावे लागत नव्हते. हे शुल्क सरकार भरत होते. नव्या नियमानुसार हे शुल्क लागणार नसल्याने सरकारवरील भार कमी होणार आहे.              

हेही वाचा