ईडीला केलवेकरकडे सापडले ४.५ किलो बनावट सोने

बनावट सोने तारण ठेवून बँकांची लुबाडणूक प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th September, 12:27 am
ईडीला केलवेकरकडे सापडले ४.५ किलो बनावट सोने

पणजी : बनावट दागिने तारण ठेवून युको बँकेची तब्बल २.६३ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संशयित आरोपी गुंडू यल्लपा केलवेकर (मुगाळी-सां जुझे द आरियल) याच्या घरातून ४.५ किलो बनावट सोने जप्त केले. बनावट सोने तारण ठेवून संशयिताने अनेक बँकांना गंडा घातला असून ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दि. ५ सप्टेंबर रोजी सक्तवसुली संचालनालयाने उत्तर गोवा आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी) ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार संशयित आरोपी सोनार हेमंत रायकर (रा. कोलवा) व गुंडू केलवेकर यांच्या निवासस्थानी तसेच इतर आस्थापनांवर छापा टाकत दस्तावेज आणि इलेक्ट्रॅानिक यंत्रणा जप्त केल्या होत्या.

संशयितांनी सोनार हेमंत रायकर याच्या संगनमताने फसव्या पद्धतीने बनावट सोने तारण ठेवून फक्त इको बँकेकडूनच नव्हे तर सहकारी बँकेसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाकडून कर्जे काढली असल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान गुंडू केलवेकर याने पत्नी मयुरी केलवेकर हिच्या मदतीने वरील बँकांमध्ये स्वतःसह इतर सहकार्‍यांच्या नावे कर्जे मिळवली आहेत.

ही कर्जाची रक्कम सहयोगीच्या बँक खात्यात वितरित झाल्यावर ती तत्काळ गुंडू केलवेकर याच्या बचत बँक खात्यात हस्तांतरीत केली गेल्याचे दिसून आले. या हस्तांतरीत झालेल्या रकमेपैकी १ कोटी २८ लाख ४० हजार रुपये एवढी रक्कम संशयित दाम्पत्याने आपल्या खात्यातून रोख स्वरुपात काढली. त्यापैकी ७९.६५ लाख रक्कम गुंडू केलवेकर याने तर ४८.७५ लाख रूपये रक्कम त्याच्या पत्नीने काढल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) युको बँकेचे सरव्यवस्थापक ज्ञानंद शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद केला होता. रायकर व केलवेकर यांना अटक केली होती. हेमंत रायकर हा बँकेचा अधिकृत सोनार असून दागिन्यांचे मूल्यांकन करण्याचे काम त्याचे होते. त्याने गुंडू यल्लपा केलवेकर याच्याशी संगनमत साधून जुलै २०१९ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव युके बँकेच्या शाखेतून बनावट दागिने (येलो गोल्ड) तारण ठेवले. या माध्यमातून विविध व्यक्तींच्या नावाने एकूण २,६३,०७,२८० रुपये कर्ज उचलण्यात आले. त्यासाठी रायकर यांनी बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले.

या प्रकरणाची दखल घेऊन ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यात मनी लॉन्ड्रिंगचा संशय आल्याने ईडीने तक्रार नोंद करून अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक प्रफुल्ल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

फसवणुकीची पद्धत

हेमंत रायकर हा बँकेचा अधिकृत सोनार होता.

रायकरने केलवेकरशी संगनमत साधून वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव शाखांमधून बनावट दागिने तारण ठेवले.

या माध्यमातून विविध व्यक्तींच्या नावाने २,६३,०७,२८० रुपये कर्ज उचलण्यात आले.

बनावट दागिन्यांचे मूल्यांकन खरे असल्याचे प्रमाणपत्र रायकरने दिले होते.

हेही वाचा