२०० ग्रॅम एमडीच्या जप्तीच्या चौकशीतून हाती लागला मोठा सुगावा
हैदराबाद : महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तेलंगणामध्ये कार्यरत असलेल्या एका लार्ज स्केल ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश आहे. या कारवाईतून तब्बल ३२ हजार लिटर लिक्विड एमडी (मेथीलीनडायऑक्सी मेथॅम्फेटामाइन) ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुरुवात २०० ग्रॅम एमडीच्या (किंमत २५ लाख रुपये ) जप्तीसंदर्भातील चौकशीपासून सुरू झाली होती. मात्र तपासाची व्याप्ती हळूहळू वाढली आणि पोलिसांनी शिताफीने तेलंगणामधील गुप्त फॅक्टरीचा माग काढला. तपासात या टोळीचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेले जाळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. फॅक्टरीतून जप्त केलेले केमिकल्स व इतर साहित्य जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री व रसायनांचा वापर करून एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात होती. आरोपींनी पुरवठादार व वितरकांचे मोठे नेटवर्क उभे केले होते. त्यामुळे या संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले. याआधीही मीरा-भाईंदर पोलिसांनी ड्रग्जविरोधी मोहिमेत यश मिळवत १५ किलो कोकेन (२२ कोटी रुपये किंमत) जप्त केले होते. त्या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह तीन जणांना अटक झाली होती.
दरम्यान, जुलै महिन्यात मुंबई पोलिसांनीदेखील ४०० कोटी रुपयांच्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करून धडक कारवाई केली होती. यानंतर याच प्रकरणात कर्नाटकातील मैसूरमध्ये छापे टाकण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ड्रग्ज सिंडिकेट देशभर किती खोलवर पसरले आहे हे स्पष्ट होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.