सडा-वास्को येथे घडली होती घटना
मडगाव : न सांगता आपली दुचाकी घेऊन गेला म्हणून भावासोबत झालेल्या भांडणात एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला. सहा महिन्यांपूर्वी सडा-वास्को येथील या घटनेने मुरगाव तालुका हादरला होता. क्षुल्लक कारणावरून आपल्या भावाचा खून करणाऱ्या संशयिताला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
श्रीकांत घिवारी हा जीवरक्षक म्हणून काम करायचा. त्याचा भाऊ मल्लिकार्जुन हा सुरक्षारक्षकाचे काम करायचा. १४ मार्च २०२५ रोजी मल्लिकार्जुन श्रीकांतची दुचाकी त्याला न विचारता घेऊन गेला. या कारणावरुन दोघांत कडाक्याचे भांडण झाले व रागाच्या भरात मल्लिकार्जुनने श्रीकांतच्या छातीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुरगाव पोलिसांनी मल्लिकार्जुन घिवारी याला अटक केली होती. मल्लिकार्जुन घिवारी याच्या जामीन अर्जावर न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ५० हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच रकमेचा हमीदार देणे, न्यायालयाच्या परवानगीविना राज्याबाहेर न जाणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करणे, वास्तव्याचा पत्ता व संपर्क क्रमांक जमा करणे, न्यायालयातील सुनावणीवेळी हजर राहणे अशा अटीशर्तीवर जामीन मंजूर केला आहे.