तीन वर्षांपूर्वीच्या घटनेचा सुड उगवण्यासाठी केला मित्र फिरोजला बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवण्याचा खटाटोप.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला बॉम्बस्फोट धमकी प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या संदेशात लष्कर-ए-जिहादी या संघटनेचे चौदा पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत शिरले असून त्यांनी तब्बल चौतीस वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स बसवले आहे, असा दावा करण्यात आला होता. या धमकीत मुंबई हादरवण्याची व हिंदू समाजाचा संहार करण्याची भाषा वापरली गेली होती. संदेश अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला आला असल्याने मुंबई पोलिसांनी तत्काळ उच्चस्तरीय बैठक घेऊन शहरात व राज्यभरात हाय अलर्ट जारी केला.
या प्रकरणाची चौकशी सुरू होताच हाती लागलेल्या काही सुगाव्यांच्या मदतीने मुंबई पोलिसांचे संयुक्त आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी नोएडा येथील गौतमबुद्ध नगरच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर स्वाट टीमच्या मदतीने केवळ चार ते पाच तासांतच नोएडातील सेक्टर ७९ मधील एका सोसायटीतून आश्विन कुमार सुप्रा याला ताब्यात घेण्यात आले.
बिहारमधील पाटलीपुत्रचा रहिवासी असलेला आणि गेली पाच वर्षे नोएड्यात वास्तव्याला असलेला हा ५१ वर्षीय व्यक्ती ज्योतिष आणि वास्तु सल्लागार म्हणून काम करत करतो. पोलिसांनी त्याच्याकडून धमकी पाठवण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन व सिम कार्ड जप्त केले. तसेच सात मोबाईल फोन, तीन सिम कार्ड, सहा मेमरी कार्ड होल्डर, एक बाह्य सिम स्लॉट, दोन डिजिटल कार्ड आणि एक मेमरी कार्ड होल्डर असे इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान धमकीमागील कारणे देखील समोर आली असून, यामुळे तपास करणाऱ्या यंत्रणा देखील चक्रावून गेल्या आहेत. आश्विन कुमारने स्वतःच्या नावाने धमकी न देता ती फिरोज नावाच्या मित्राच्या नावाने पाठवली होती. २०२३ साली फिरोजने पाटण्यातील फुलवारी शरीफ पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात त्याला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याचाच सूड उगवण्यासाठी त्याने हा बनाव रचला आणि फिरोजला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला.
आश्विन कुमार हा पदव्युत्तर शिक्षित असून त्याचे वडील निवृत्त शिक्षण विभाग अधिकारी तर आई गृहिणी आहे. पत्नीपासून दुरावा आणि आर्थिक वादामुळे तो वैयक्तिक आयुष्यात मोठ्या तणावाखाली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १९६ (१)(अ)(ब), ३५१(२), ३५१(३) आणि ३५१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीला मुंबईत आणून क्राईम ब्रांचमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. धमकीच्या संदेशामागील खरे हेतू, इतर कोणी सहभागी होते का याचा तपासही युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे.