पालक रागावल्याचे कारण : कोलवा पोलिसांच्या प्रतिसादामुळे मुले सुरक्षित
मडगाव : शाळेत न गेल्यामुळे पालकांनी ओरडल्याचा राग मनात धरत वार्कातील दोन अल्पवयीन मुले घर सोडून रेल्वेतून दिल्लीकडे रवाना झाली होती. या घटनेची कोलवा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने अखेर महाराष्ट्रात ही मुले आढळून आली. त्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी वार्का येथील यदुनंदन यादव (मूळ बिहार) व जोगेंद्र प्रधान (मूळ ओडिशा) यांनी कोलवा पोलिसात मुले बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यादव व प्रधान हे शेजारी राहत असून एकाचा १४ वर्षांचा तर दुसऱ्याचा १३ वर्षांचा मुलगा शुक्रवारपासून घरी आला नसल्याचे त्यांनी सांगितले. ही दोन्ही मुले इयत्ता नववीत एकाच शाळेत शिकत होती. ५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शाळेतील शिक्षकांनी असाइन्मेंट दिलेली असून शिकवणीला जात असल्याचे सांगत ते दोघेही घराबाहेर पडले होते. कोलवा पोलिसांनी पालकांकडे केलेल्या चौकशीवेळी जोगेंद्र प्रधान यांनी त्यांचा मुलगा दोन दिवस शाळेत गेला नव्हता त्यामुळे ते त्याला ओरडले होते. याच कारणास्तव शेजारील मुलाला सोबत घेत त्याने घर सोडले असल्याचे कारण समोर आले.
कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची स्थापना करत तपास सुरू केला. पालकांसह इतर ओळखीच्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच सीसीटीव्ही फुटेज वरून दोन्ही मुले रेल्वे स्थानकावर गेली होती. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज वरून दिल्लीच्या गाडीत दोन्ही मुले चढल्याचे दिसून आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना याबाबत माहिती देत दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेत चढलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना महाराष्ट्रातील नाशिकमधील भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरवून घेण्यात आले. सध्या दोन्ही अल्पवयीन मुले महाराष्ट्रातील रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात सुरक्षित आहेत. कोलवा पोलिसांचे पथक सदर मुलांना आणण्यासाठी रवाना झालेले आहे. कोलवा पोलिसांना अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याबाबत माहिती मिळताच तत्काळ केलेल्या कारवाईमुळे दोन्ही मुलांना सुखरूप आहेत.