म्हापसा : पार्किंगवरुन उद्भवलेल्या वादाचे शिवीगाळ आणि नंतर धक्काबुक्कीत पर्यवसान

यूपीच्या महिला न्यायाधीश आणि रेस्टोरंट मालकाने दाखल केली परस्पर विरोधी तक्रार.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th September, 10:13 am
म्हापसा : पार्किंगवरुन उद्भवलेल्या वादाचे शिवीगाळ आणि नंतर धक्काबुक्कीत पर्यवसान

पणजी : हणजुण येथील पर्पल मार्टिनी रेस्टॉरंटमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादामुळे उत्तर प्रदेशातील नागरी न्यायाधीश दिपांशी चौधरी आणि त्यांचे पती नितीन लाल तसेच रेस्टॉरंट मालक समर्थ सिंगल यांनी हणजुण पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली असून, दोन्ही तक्रारी उशिरा रात्री पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या.

न्यायाधीश दिपांशी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वादादरम्यान संशयित अमित मिश्रा आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना ढकलण्यात आले तसेच न्यायाधीश चौधरी यांच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय गंभीर परिणामांची धमकी देत त्यांना रेस्टॉरंटमधून जबरदस्ती बाहेर काढण्यात आले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. या तक्रारीवरून हणजुण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२), ३५२ आणि ३५१(३) सह ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

याउलट रेस्टॉरंट मालक समर्थ सिंगल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, न्यायाधीश दिपांशी चौधरी आणि त्यांचे पती नितीन लाल यांनीच रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावले, अमित मिश्रा आणि पॉल या कर्मचाऱ्यांना अडवून त्रास दिला, असा त्यांचा आरोप आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ आणि १२६(२) सह ३(५) अंतर्गत दुसरा गुन्हा नोंदवला आहे.

दोन्ही प्रकरणांत हणजुण पोलिसांनी तपास सुरू केला असून, नेमके काय घडले याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा