पोलिसांकडून दोघा संशयितांविरोधात २४ गुन्हे दाखल
पणजी : कुडचडे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी संशयित तन्वी वस्त आणि बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक आनंद जाधव (रा. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. दरम्यान या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे.
कुडचडे पोलिसांनी वरील दोघा संशयितांविरोधात ९३ लाख फसवणूक प्रकरणी २४ गुन्हे दाखल केले. त्यातील फक्त ४ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यामुळे त्या संदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
रुझालिना कुरैया डायस यांचे सुमारे २५ लाखांचे सोन्याचे दागिने व ५.५० लाखांची रक्कम तर, क्रिस्टालिना कुतिन्हो यांचे १४.२८ लाख रुपये तन्वीने आपल्या खात्यात जमा केले. सेवेरिना फर्नांडिस यांच्या खात्यातील १.४० लाख व त्यांच्याकडून घेतलेले २.६४ लाख असे एकूण ४.०४ लाखांचा घोटाळा तन्वीने केला. तसेच सुषमा अस्थाना यांच्या खात्यातील २९.६९ लाख रुपये तन्वीने आपल्या खात्यात वळवले होते. या चारही प्रकरणांत तन्वी वस्त व आनंद जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करून कुडचडे पोलिसांनी तपास सुरू केला.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कुडचडे शाखेत एका बिगर सरकारी संस्थेची प्रतिनिधी म्हणून ती काम करत होती. ती बँकेची कर्मचारी नव्हती. असे असताना तिला बँकेच्या कामकाजात ढवळाढवळ करू दिली. ग्राहकांनी फिक्स डिपॉझिटची पावती न मिळाल्याच्या तक्रारी केल्यानंतरही व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तन्वीने ते पैसे आपल्या खात्यात वळवल्याचे पोलीस तपासात समोर आले.
१८ नोव्हेंबर २०२४ वरील घोटाळा समोर
तन्वी बँकेत फिक्स डिपॉझिट किंवा पैसे भरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांच्या सह्या घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यात वळवत होती. तन्वी वस्त हिच्या विरोधात प्रथम २०२३ मध्ये तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर तिला काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, २ जुलै २०२४ रोजी रुझालिना कुरैया डायस यांनी बँकेत वरील प्रकार नमूद केला. त्यानंतर आणखीन तक्रार आल्यानंतर १८ नोव्हेंबर २०२४ वरील घोटाळा समोर आला.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार
या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय आल्याने ईडीने चौकशी सुरू केली आहे. ईडी तक्रारदारांची जबाब नोंद करत असून संशयितांसह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.