अपघातात मृत रुग्णाच्या नातेवाईकांना ४१ लाखांच्या नुकसान भरपाईचा आदेश

उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाकडून प्रकरण निकाली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th September, 11:13 pm
अपघातात मृत रुग्णाच्या नातेवाईकांना ४१ लाखांच्या नुकसान भरपाईचा आदेश

पणजी : पेलोवाडा-उसकई येथे २०१७ मध्ये हळदोणा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका आणि मारुती ओम्नी व्हॅनच्या अपघातात दिलीप घाडी (हळदोणा) या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना ४१ लाख २९ हजार २५० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वरील रकमेवर २४ एप्रिल २०१८ पासून रक्कम लवादाकडे जमा करण्याच्या दिवसापर्यंत ६ टक्के व्याज द्यावे, असा आदेश मेरशी येथील उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाचे अध्यक्ष विजया आंब्रे यांनी विमा कंपनीला दिला.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी १९ एप्रिल २०१७ रोजी व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. त्यानुसार, १८ एप्रिल २०१७ रोजी दिलीप घाडी हे एका झाडावरून पडून जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हळदोणा आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे म्हापसा जिल्हा रुग्णालयात हलवले जात होते. याचवेळी पेलोवाडा-उसकई येथे त्यांची रुग्णवाहिका आणि एका मारुती ओमनी व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दिलीप घाडी गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने गोमेकाॅत हलवण्यात आले. परंतु, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. म्हापसा पोलिसांनी व्हॅन चालकावर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी दिलीप घाडी यांच्या पत्नी दिशा आणि मुलगा देवांग यांनी मोटार अपघात दावा लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, रुग्णवाहिका चालक राघोबा सावंत, व्हॅन चालक थाॅमस रॉड्रिग्ज, व्हॅन मालक आग्नेलो राॅड्रिग्ज आणि रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रतिवादी केले होते. लवादाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्ष विचारात घेऊन व्हॅन चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याचा निष्कर्ष काढला. दरम्यान, लवादाकडे सुनावणी सुरू असताना व्हॅन चालक आणि मालकाचे निधन झाले होते. या प्रकरणी लवादाने सर्वांची बाजू एेकून घेतल्यानंतर विमा कंपनीला घाडी याच्या कुटुंबीयांना वरील नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

लवादातील युक्तिवाद
- दिलीप घाडी यांच्या कुटुंबीयांनी ३७ लाख ९०० रुपयांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवादाकडे दावा केला. त्यांच्या वतीने अॅड. आर. मोरजकर यांनी युक्तिवाद केला की, घाडी यांच्या पेंटींगचा आणि शेतीचा व्यवसाय होता. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला.
- प्रतिवादींतर्फे दोन्ही चालकांनी आणि व्हॅनच्या मालकाने घाडी यांचा मृत्यू झाडावरून पडल्यामुळे झाला असून, अपघातामुळे नाही, असा दावा करत याचिका फेटाळण्याची मागणी केली.

हेही वाचा