आसगाव, पर्रा येथील प्रकरणात एसआयटीची कारवाई सुरू
पणजी : गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आसगाव आणि पर्रा येथील जमीन हडप प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य संशयित राजकुमार मैथी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाची सुरुवात १२ जून २०२२ रोजी नवी दिल्ली येथील विन्सेंट डिसोझा यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीने झाली होती. त्यांनी आसगाव येथील सर्व्हे क्र. ८०/१ मधील १,०५० चौमी, सर्व्हे क्र. ८०/३ मधील २,३०० चौमी, सर्व्हे क्र. ७८/२ मधील १८,५०० चौमी वडिलोपार्जित जमीन हडप केल्याचे म्हटले होते. म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा नंतर एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आणि निरीक्षक नितीन हळर्णकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात, शेट्येवाडा-म्हापसा येथील आंतोनियो ब्रागांझा यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पर्रा येथील सर्व्हे क्रमांक ३७/३ आणि ३७/६ मधील त्यांची वडिलोपार्जित जमीन संशयित ब्रांका दिनिज आणि रॉयसन्स रॉड्रिग्ज यांनी बनावट विक्रीपत्र आणि वारसदार तयार करून आपल्या नावावर करून घेतली. एसआयटीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गडकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एसआयटीची कठोर भूमिका
दोन्ही प्रकरणांच्या तपासात एसआयटीने संशयित रॉयसन्स रॉड्रिग्ज आणि मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस यांना अटक केली आहे. सध्या मायकल फर्नांडिस न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला अटक होण्याची शक्यता असल्याने राजकुमार मैथीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही प्रकरणांतील त्याच्या अर्जांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने ते फेटाळून लावले.