पुरावे असल्याने लैंगिक अत्याचारप्रकरणी युवकाविरोधात आरोप निश्चितीचे आदेश

तिसवाडी तालुक्यातील १६ वर्षीय मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th September, 11:10 pm
पुरावे असल्याने लैंगिक अत्याचारप्रकरणी युवकाविरोधात आरोप निश्चितीचे आदेश

पणजी : तिसवाडी तालुक्यात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात संशयिता विरोधात प्रथमदर्शनी पुरावे आहे. असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाने २५ वर्षीय संशयिताविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. याबाबतचा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.
या प्रकरणी आगशी पोलिसांनी २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. त्यात १६ वर्षीय पीडित मुलगी बारावीचे शिक्षण घेत असताना संशयिताने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर संशयित युवकाने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास तिला मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. तसेच संशयिताकडे याबाबत चौकशी केली असता, संशयिताने नातेवाईकाना शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून २५ वर्षीय युवकाला अटक केली. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.

डायरीतील पुराव्यामुळे आरोप निश्चित
या प्रकरणी पोलिसांनी तपासपूर्ण करून संशयिताविरोधात पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयिताचा मोबाईल आणि डायरी पीडित मुलीच्या घरी सापडली. तसेच पोलिसांनी संशयिताची दुचाकी जप्त केली होती. तसेच पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीवरून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच संशयिताविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोप निश्चित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा