६९९ रुपयांच्या पार्सल घोटाळ्यापासून सावधान!

कुरियर कार्यालयाच्या चौकशीची मागणी : कुरियरच्या नावाखाली वास्कोमध्ये अनेकांची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
६९९ रुपयांच्या पार्सल घोटाळ्यापासून सावधान!

वास्को : सध्या कुरियर डिलिव्हरीच्या नावाखाली एक नवीन प्रकारचा आर्थिक घोटाळा समोर येत आहे. यामध्ये लोकांना 'कॅश ऑन डिलिव्हरी'द्वारे ६९९ रुपयांचे पार्सल पाठवले जाते. लोक घरातून किंवा कार्यालयातून कोणीतरी ही वस्तू ऑर्डर केली असेल या समजुतीने पैसे देऊन पार्सल स्वीकारतात, मात्र आतमध्ये दहा रुपयांचीही किंमत नसलेला साबण किंवा शाम्पू यांसारखे निकृष्ट दर्जाचे उत्पादन आढळते.
या फसवणुकीत, कुरियर कर्मचारी पार्सल घेऊन येतो आणि ग्राहकाला लगेच ६९९ रुपये देण्यास सांगतो. पार्सलवर पाठवणाऱ्याचे नाव, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक नसतो, त्यामुळे ग्राहकाला कोणाशी संपर्क साधावा हे कळत नाही. जेव्हा पार्सल उघडले जाते, तेव्हा त्यात अत्यंत स्वस्त वस्तू मिळते. जरी एका व्यक्तीसाठी ६९९ रुपये ही लहान रक्कम असली तरी, दिवसाला १०० लोकांना फसवे पार्सल पाठवले तर घोटाळेबाज सुमारे ७० हजार रुपये कमावतात.
या घोटाळ्यासाठी एका नामांकित कुरियर कंपनीचा वापर होत असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. कुरियर कंपन्यांनी अशा विक्रेत्यांची पडताळणी न करता पार्सल स्वीकारणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी
यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. लोकांनी या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने या भामट्यांचे फावले आहे. यामुळे, पोलिसांनी या प्रकरणी कुरियर डिलिव्हरी कर्मचारी आणि त्यांच्या स्थानिक कार्यालयाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
यापासून बचाव कसा कराल?
* कोणत्याही 'कॅश ऑन डिलिव्हरी' पार्सलला पैसे देण्यापूर्वी ते घरातून किंवा कार्यालयातून कोणी मागवले आहे का याची खात्री करा.
* पार्सलवर विक्रेत्याची माहिती नसल्यास सावध रहा.
* पार्सलवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
* हा केवळ ६९९ रुपयांचा प्रश्न नसून, अशा भामट्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा आहे.      

हेही वाचा