गोवा : क्षुल्लक कारणांमुळे लोकांनी रस्त्यावर उतरू नये : मुख्यमंत्री

गृह खाते योग्य ती कारवाई करते

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th September, 11:51 pm
गोवा : क्षुल्लक कारणांमुळे लोकांनी रस्त्यावर उतरू नये : मुख्यमंत्री

पणजी : लोकांना क्षुल्लक कारणांसाठी रस्त्यावर उतरण्याची सवय झाली आहे. अशा वेळी गृह खाते योग्य ती कारवाई करत असते. त्यामुळे लोकांनी क्षुल्लक कारणांसाठी रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केले.

म्हापसा-एकतानगर येथे विद्युत रोषणाईवरून एका हिंदू महिलेने मुस्लिम लोकांना शिवीगाळ केल्याने रविवारी तणाव निर्माण झाला होता. त्या हिंदू महिलेने पोलीस ठाण्यात माफी मागितल्याने प्रकरण शांत झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले.

म्हापसा-एकतानगर येथे रविवारी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई केली. त्याचप्रमाणे, वास्को येथेही धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अशा घटनांवर गृह खाते कारवाई करत असते. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

म्हापसा-एकतानगर येथे मशीद समितीने रोषणाई करून फलक लावले होते. या फलकांमुळे हिंदू महिला आणि मुस्लिमांमध्ये वाद सुरू होता. एका महिलेने शिवीगाळ केल्याची तक्रार मुस्लिमांनी म्हापसा पोलिसांत केली. यामुळे वाद निर्माण झाला होता. म्हापसा पोलिसांनी दोन्ही गटांशी चर्चा करून हा वाद मिटवला.

हेही वाचा