नेपाळमध्ये अराजक

संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय आगीच्या भक्ष्यस्थानी


7 hours ago
नेपाळमध्ये अराजक

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
काठमांडू : काठमांडूसह प्रमुख शहरांत सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या दुसऱ्या दिवशी नेपाळमधील परिस्थिती आणखी बिकट झाली. निदर्शकांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या वैयक्तिक निवासस्थानाला आग लावली. सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. त्यांनी दोन माजी पंतप्रधानांच्या घरांवरही हल्ला केला. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला, तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसक घटनांनंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला आग लावली. त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर या यामध्ये गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पळवून-पळवून मारण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निदर्शक त्यांना छातीवर लाथ मारताना दिसत आहेत.
प्रचंड दबावादरम्यान, नेपाळमध्ये युती सरकार तुटण्याचा धोका वाढला आहे. शेर बहादूर देऊबा यांची नेपाळी काँग्रेस ८८ जागांसह आणि के. पी. शर्मा ओली यांची सीपीएन (यूएमएल) ७९ जागांसह जुलै २०२४ पासून देशात एकत्रितपणे सरकार चालवत होते. नेपाळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.
कास्की तुरुंगातून ९०० कैदी फरार
मंगळवारी संध्याकाळी नेपाळमधील कास्की जिल्ह्यातील तुरुंगातून ९०० कैदी पळून गेले. निदर्शकांनी तुरुंगावर हल्ला केला, कुलूप तोडले आणि कैद्यांना बाहेर काढले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदर्शक सरकारी कार्यालये आणि तुरुंगांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती होती, म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली. तरीदेखील निदर्शकांनी तुरुंगात घुसून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण केली आणि नंतर कैद्यांना सोडले. याआधी नाखू तुरुंगातून १५०० कैदी पळून गेले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या फायली जाळल्या
राजधानी काठमांडूमधील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात जाळपोळीच्या घटना घडल्या. सर्वोच्च न्यायालयाचे वकील नीरंजन पांडे यांनी सांगितले की, निदर्शकांनी न्यायालयाच्या आत पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि त्यांना आग लावली. यादरम्यान, निदर्शकांनी अॅटर्नी जनरलच्या कार्यालयावरही हल्ला केला आणि तेथे तोडफोड आणि आग लावली. इतकेच नाही तर विशेष न्यायालय आणि काठमांडू जिल्हा न्यायालयातही अशाच घटना घडल्या. निदर्शकांनी अॅटर्नी जनरल कार्यालय, विशेष न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातून अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या फायली बाहेर काढल्या आणि त्या जाळून टाकल्या.
आंदोलकांनी सीआयएए कार्यालयाला लावली आग
मंगळवारी संध्याकाळी आंदोलकांनी काठमांडूमधील सीआयएए कार्यालयाला आग लावली. सीआयएएचे काम सरकारी संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सत्तेचा गैरवापर तपासणे आहे. या जाळपोळीत इमारतीचे मोठे नुकसान झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
काठमांडूमध्ये ३ पोलिसांचा मृत्यू
मंगळवारी काठमांडूच्या कोटेश्वर भागात निदर्शनादरम्यान झालेल्या हल्ल्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला. निदर्शकांनी प्रथम स्थानिक पोलीस चौकीला आग लावली. त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या पोलिसांना रस्त्यावर आणून त्यांच्यावर हल्ला केला. काठमांडूचे पोलीस अधीक्षक अपिल बोहरा यांनी सांगितले की, कोटेश्वर पोलिस चौकीत तैनात तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
लष्कराचे संयम बाळगण्याचे आवाहन
हिंसक निदर्शनांमध्ये लोकांच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे आश्वासन नेपाळ लष्कराने पुन्हा एकदा दिले आहे. परिस्थिती आणखी बिघडू नये, म्हणून सर्व नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन लष्कराने केले आहे. राष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, याचीही आठवण करून दिली.
बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी
नेपाळमधील आंदोलक सोशल मीडियाच्या माध्यमातून बालेन शाह यांना पुढील पंतप्रधान बनवण्याची मागणी करत आहेत. सध्या ते काठमांडूचे महापौर आहेत.
भारताकडून सीमेवर ‘हाय अलर्ट’
नेपाळमध्ये वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने भारत-नेपाळ सीमेवर दक्षता वाढवली आहे. पश्चिम बंगालच्या पानीटंकी सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. अधीक्षक प्रवीण प्रकाश यांनी सांगितले की, सीमेवर पोलीस चौकी उभारण्यात आली आहे आणि तैनाती वाढवण्यात आली आहे. अधिकारी सीमेपलीकडे सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा