राज्यातील ५० टक्के उत्पादन तयार; फलोत्पादन महामंडळाचा दसऱ्यापूर्वी दर स्थिर होण्याचा अंदाज
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील नारळ उत्पादकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंदा पावसाळ्यानंतरचे पीक चांगले असून सध्या तब्बल ५० टक्के नारळाचे उत्पादन तयार झाले आहे. उर्वरित उत्पादनही दोन आठवड्यांत पिकून बाजारपेठेत येण्यासाठी सिद्ध असेल. पुरवठा वाढल्याने दसऱ्यापूर्वी बाजारात नारळाचे दर स्थिर राहतील, अशी माहिती गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रहास देसाई यांनी दिली.महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना बाजारात पाठवून नारळाच्या दरांच्या तपासणीचे काम सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारळाचे आकारमानानुसार दर सध्या ३० ते ४० रुपयांपर्यंत आहेत. पावसाळा ओसरल्याने गेल्या काही दिवसांत हे दर स्थिरावले असून उत्पादक व ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
राज्यातील नारळ पिकताच ते बागायतदारांकडून पाडले जातात. त्यानंतर सोलणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया हळूहळू गती घेत असून पुढील दोन आठवड्यांत १०० टक्के पीक उपलब्ध होईल. यामुळे दसऱ्यापूर्वी बाजारात पुरेसा साठा उपलब्ध होईल. त्यामुळे दरात चढ-उतार होणार नाही, अशी खात्री डॉ. देसाई यांनी व्यक्त केली.
स्थानिक नारळाला प्राधान्य
गोवा फलोत्पादन महामंडळ आपल्या विक्री केंद्रांवर अनुदानित दराने नारळ विक्री सुरू ठेवण्याचा विचार करत आहे. या विक्रीत स्थानिक गावठी नारळांना प्राधान्य देण्यात येणार असून पुरवठा अपुरा पडला तरच अन्य राज्यांतील नारळ बाजारात आणले जातील. गोव्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे, असेही डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.
पुरवठा वाढल्याने दर स्थिर राहतील
बाजारात नारळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दसऱ्यापर्यंत दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. उलट पुरवठा वाढल्याने दर स्थिर राहतील. त्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात परवडणाऱ्या किमतीत नारळ मिळण्याची खात्री आहे.
गणेश चतुर्थीला १ लाख नारळांची विक्री
गोवा फलोत्पादन महामंडळाने यावर्षी गणेश चतुर्थीच्या काळात अनुदानित दरात तब्बल १ लाख नारळांची विक्री केली. हे नारळ कर्नाटकातील शिमोगा परिसरातून आयात करण्यात आले होते. १४, २०, २५ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी चार टप्प्यांमध्ये प्रत्येकी २५ हजार नारळांचा पुरवठा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात सर्व एक लाख नारळांची विक्री झाली. यातून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. आगामी काळात अशीच विक्री सुरू ठेवण्याचा महामंडळाचा विचार आहे.