घटनेवेळी साक्षीदार मद्यधुंद, उलटतपासणीत विसंगतीमुळे खूनप्रकरणी संशयित निर्दोष

उच्च न्यायालयाचा निवाडा : सत्र न्यायालयाने दिली होती १० वर्षे कारावासाची शिक्षा


7 hours ago
घटनेवेळी साक्षीदार मद्यधुंद, उलटतपासणीत विसंगतीमुळे खूनप्रकरणी संशयित निर्दोष

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : घटनेच्या वेळी एकमेव प्रत्यक्षदर्शी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या उलटतपासणीत विसंगती आढळून आली. इतर साक्षीदारांचे पुरावे, वैद्यकीय पुरावे आरोपीशी जोडलेले नाहीत. शस्त्रावरील, घटनेच्या ठिकाणचे, पीडितेच्या जखमेवरील रक्ताचे नमुने आरोपीशी जुळत असल्याचे पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी इग्नेशियस मिंज (झारखंड) याची सदोष मनुष्यवध प्रकरणातून निर्दोष सुटका केली. हा आदेश न्या. वाल्मिकी मिनिझीस यांनी दिला.
इग्नेशियस मिंज यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी थाडियस बारा याच्या मृत्यू प्रकरणी मिंज याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली १० वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला मिंजने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
आरोपी मिंज आणि बारा एकाच बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत होते. ते दोघे इतर कामगारांसह वार्का येथे एकाच ठिकाणी राहत होते. व्यावसायिकाने ९ जुलै २०१८ रोजी कोलवा पोलिसांना बारा याच्यावर अज्ञाताने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मिंज याला अटक केली. सत्र न्यायालयाने मिंज याला सदोष मनुष्यवध प्रकरणी १० वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकादार मिंजतर्फे अॅड. एल. रघुनंदन यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षीत तफावत आहे. तपास अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारावर मिंजला संशयित म्हटले, हे स्पष्ट झाले नव्हते. ज्या प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीवरून निकाल दिला, तो घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता. साक्षीदाराचा जबाब २० सप्टेंबर २०१८ रोजी पोलिसांनी नोंद केला. २८ सप्टेंबर २०१८ रोजी त्याची न्यायदंडाधिकाऱ्यासमोर साक्ष नोंदविण्यात आली. मिंजला ९ जुलै २०१८ रोजी अटक केली होती. इग्नेशियस मिंजची निर्दोष सुटका करावी, अशी मागणी अॅड. रघुनंदन यांनी केली होती. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून मिंजची निर्दोष सुटका केली.
उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण
१ एकमेव प्रत्यक्षदर्शी त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता.
२. प्रत्यक्षदर्शीच्या उलटतपासणीत विसंगती आढळून आली.
३. इतर साक्षीदारांचे पुरावे, वैद्यकीय पुरावे आरोपीशी जुळलेले नाहीत.
४. शस्त्रावरील, घटनेच्या ठिकाणचे, जखमेवरील रक्ताचे नमुने आरोपीशी जुळत नाहीत.

हेही वाचा