भारतीय पुरुष हॉकी संघाला आशिया कपचे विजेतेपद

अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर ४-१ ने दणदणीत विजय

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
07th September, 11:55 pm
भारतीय पुरुष हॉकी संघाला आशिया कपचे विजेतेपद

जकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने २०२६ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही थेट पात्रता मिळवली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित राहून आपले वर्चस्व सिद्ध केले आणि अंतिम सामन्यातही कोरियन संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही.भारताचा गोलचा पाऊस
सामन्याची सुरुवात भारतासाठी धमाकेदार झाली. अवघ्या काही सेकंदातच सुखजीत सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ कायम ठेवत कोरियन संघावर दबाव ठेवला. दुसऱ्या सत्रात दिलप्रीत सिंगने २७व्या मिनिटाला आणखी एक गोल करून भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली, ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला.
तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडू संजयला ग्रीन कार्ड मिळाल्याने काही काळ भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र, या आव्हानात्मक परिस्थितीतही दिलप्रीत सिंगने आपला दुसरा गोल करत भारताची आघाडी ३-० अशी वाढवली. चौथ्या सत्रात अमित रोहिदासने ४९व्या मिनिटाला गोल करून भारताचा विजय जवळजवळ निश्चित केला. दक्षिण कोरियाकडून सोन दियानने ५०व्या मिनिटाला एकमेव सांत्वनपर गोल केला. अखेर, भारताने ४-१ असा विजय मिळवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने हॉकी आशिया कपचा किताब चौथ्यांदा जिंकला आहे. याआधी २००३, २००७ आणि २०१७ मध्ये भारताने हा पराक्रम केला होता. या विजयाने भारताने तीन वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या पाकिस्तानला मागे टाकले आहे. भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीमुळे देशातील हॉकी चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि आता सर्वांचे लक्ष २०२६ च्या विश्वचषकाकडे लागले आहे.

हॉकीत भारताची अभूतपूर्व कामगिरी
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई हॉकीमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताने एकाच वेळी चार मोठ्या स्पर्धांची विजेतेपदे पटकावली आहेत. सध्या भारतीय पुरुष हॉकी संघ ज्युनियर एशिया कप, सीनियर एशिया कप, एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एशियन गेम्स या सर्व स्पर्धांचा विद्यमान विजेता आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे भारतीय हॉकीचे आशियातील वर्चस्व अधोरेखित झाले असून, भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.