नोव्हेंबरमध्ये यजमानपदाचा अंतिम निर्णय : प्रस्ताव सादर करण्याची ३१ ऑगस्ट होती अंतिम मुदत
नवी दिल्ली : भारताने २०३० मध्ये होणाऱ्या १०० व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमानपदासाठी आपला प्रस्ताव सादर केला आहे. भारतासोबतच नायजेरियानेही या खेळांच्या आयोजनासाठी दावेदारी केली आहे. ३१ ऑगस्ट ही प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे, आता भारत आणि नायजेरिया यांच्यात यजमानपदासाठी स्पर्धा होणार आहे.कॉमनवेल्थ स्पोर्ट्सचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी यावर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, २०३० च्या शताब्दी कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमानपदासाठी भारत आणि नायजेरियाने प्रस्ताव सादर केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या दोन क्रीडा महाशक्तींकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हे दर्शवतो की कॉमनवेल्थ गेम्सचे महत्त्व आणि त्याचा वारसा अजूनही टिकून आहे.
यजमान निवडीची प्रक्रिया
कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या कार्यकारी मंडळाने या प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद बारबाडोस कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन आणि ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा सँड्रा ओसबोर्न केसी यांच्याकडे आहे. या समितीमध्ये हेलेन फिलिप्स, ब्रेंडन विलियम्स, इयान रीड आणि अँड्र्यू रायन यांचाही समावेश आहे. मूल्यांकन प्रक्रियेनुसार, सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस लंडनमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी आपले प्रस्ताव वैयक्तिकरित्या सादर करतील. त्यानंतर, समिती आपला अहवाल कार्यकारी मंडळाला सादर करेल, जे ७४ सदस्य राष्ट्रांसाठी यजमानाची शिफारस करतील. यजमान देशाची अंतिम घोषणा नोव्हेंबर २०२५ मध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाईल.
भारताने यापूर्वीही केले स्पर्धेचे आयोजन
भारताने याआधी तीन मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये १९५१ आणि १९८२ च्या एशियन गेम्सचा, तसेच २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सचा समावेश आहे. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स दिल्लीमध्ये पार पडले होते. या व्यतिरिक्त, भारताने २०३६ च्या ऑलिंपिक खेळांच्या यजमानपदासाठीही दावा केला आहे. २०३२ पर्यंतचे ऑलिंपिकचे यजमान निश्चित झाले आहेत, ज्यात २०२८ चे ऑलिंपिक लॉस एंजेलिसमध्ये तर २०३२ चे ऑलिंपिक ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात होणार आहे.