पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच प्रवेश
न्यूयॉर्क : भारतीय टेनिससाठी अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक कामगिरी युकी भांब्रीने युएस ओपन २०२५ मध्ये साध्य केली आहे. दुखापतींमुळे एकेरी करिअर थांबल्यानंतर दुहेरीवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या या अनुभवी खेळाडूने आपल्या जोडीदार न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससोबत मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रथमच प्रवेश केला आहे.
१४ व्या मानांकित इंडो-किवी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत मोठा पराक्रम केला. त्यांनी ११ व्या मानांकित निकोला मेकटिक आणि राजीव राम या अनुभवी जोडीचा ६-३, ६-७, ६-३ अशा सेट्समध्ये पराभव केला. यापूर्वी प्री-क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी चौथ्या मानांकित जर्मन जोडी केविन क्रॉविट्झ आणि टिम पुएट्झ यांचा ६-४, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला होता. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना १ तास २३ मिनिटे लागली.
सामन्यानंतर युकी भांब्री म्हणाला, हा सामना खूप अटीतटीचा होता. प्रतिस्पर्धी हे अनेक वेळचे ग्रँड स्लॅम विजेते खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव आमच्यासाठी आव्हानात्मक ठरला. डोक्यात बरेच विचार येत होते, पण संयम राखून खेळल्याने विजय मिळवता आला.
आता भांब्री-व्हीनस जोडीचा सामना सहाव्या मानांकित ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी या जोडीशी होणार आहे. हा सामना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या कसोटींपैकी एक ठरणार आहे.
३३ वर्षीय युकी भांब्री हा भारताचा माजी ज्युनियर वर्ल्ड नंबर वन आहे. त्याने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनियर ग्रँड स्लॅम जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, वारंवार झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या एकेरी कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला.
एकेरीत तो कधीही यूएस ओपनच्या पहिल्या फेरीपलीकडे जाऊ शकला नव्हता. दुहेरीत मात्र त्याने २०२५ मध्ये फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत पोहोचून दमदार कामगिरी केली. आता यूएस ओपनमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करून त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम यश संपादन केले आहे. लिएंडर पेस, महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या दिग्गजांनंतर आता युकी भांब्रीनेही पुरुष दुहेरीत भारताचे वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे भारतीय टेनिस चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. युकी भांब्रीचा हा ऐतिहासिक पराक्रम केवळ त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीतील नव्हे तर भारतीय टेनिसच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला आहे. दुखापतींशी लढा देत पुन्हा नव्याने उभा राहिलेला युकी आता ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या दिशेने पुढे जात आहे.
पुरुष एकेरीत चुरशीच्या लढती
दरम्यान, यूएस ओपन पुरुष एकेरीत अनुभवी नोवाक जोकोविच आणि युवा स्टार कार्लोस अल्काराझ यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचने अमेरिकन टेलर फ्रिट्झचा ६-३, ७-५, ३-६, ६-४ असा पराभव केला. अल्काराझने जिरी लेहेकाला ६-४, ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभूत केले. ता उपांत्य फेरीत जोकोविच विरुद्ध अल्काराझ अशी हायव्होल्टेज लढत रंगणार आहे.