पणजी : गोवा क्रिकेट संघटनेची (जीसीए) निवडणूक १६ सप्टेंबर रोजी होणार असून, विद्यमान व विरोधी अशा दोन्ही गटांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. १० सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, ११ सप्टेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
विद्यमान अध्यक्ष विपूल फडके यांनी सांगितले की, आजवर जीसीएसाठी झालेल्या कामांचा आढावा क्लब प्रतिनिधींनी घ्यावा. स्टेडियम उभारणीसारखे महत्त्वाचे मुद्देही चर्चेत आहेत. बहुसंख्य क्लबांचा पाठिंबा आमच्या पॅनलला आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, रोहन गावस देसाई व चेतन गावस यांच्या पॅनलनेही प्रचाराला सुरुवात केली असून, विविध क्लब्सशी थेट संपर्क साधला जात आहे. आजपर्यंत जीसीएसाठी खरे योगदान कोणी दिले आहे, हे क्लब्सना ठाऊक आहे. आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असा विश्वास अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर यांनी व्यक्त केला.