सचिन तेंडुलकर : २८ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा
मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे की ते बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. बीसीसीआयला सध्या रॉजर बिन्नी यांचा उत्तराधिकारी शोधायचा आहे. बिन्नी यांनी ७० वर्षांचा वयाचा टप्पा गाठल्याने नियमांनुसार त्यांना पद सोडावे लागले.
बीसीसीआयच्या संविधानानुसार कोणताही पदाधिकारी ७० वर्षांनंतर पदावर राहू शकत नाही. त्यामुळे बिन्नी यांनी पद रिक्त केले असून, सध्या राजीव शुक्ला कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
दरम्यान, काही वृत्तांमध्ये तेंडुलकर अध्यक्षपद स्वीकारतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र सचिन यांनी या अफवांपासून स्वत:ला दूर ठेवत कोणतीही प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.
सचिन रमेश तेंडुलकर स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रा. लि. यांनी अधिकृत निवेदन जारी करून या अफवांवर पूर्णविराम दिला. माध्यमांमध्ये सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआय अध्यक्षपदासाठी विचार करण्यात येत आहे किंवा त्यांची उमेदवारी आहे, अशा बातम्या झळकत आहेत. मात्र या गोष्टींना कोणताही आधार नाही. अशा चुकीच्या बातम्या पसरवू नयेत, असे कंपनीने म्हटले आहे.
पूर्वी २०१९ ते २०२२ दरम्यान माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर १९८३ च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू रॉजर बिन्नी अध्यक्ष झाले.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबरला होणार असून, त्यावेळी अध्यक्षपदासह आयपीएल चेअरमन पदासाठी निवडणुका घेतल्या जातील. सध्याचे आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यांनी सलग सहा वर्षे प्रशासकीय पदे भूषवली असल्याने त्यांना आता 'कूल-ऑफ पिरियड' घ्यावा लागणार आहे.
तसेच, एका माजी भारतीय फिरकीपटूने दक्षिण विभाग निवड समितीच्या सदस्यपदासाठी अर्ज केला असल्याचे समजते. श्रीधरन शरथ यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर हे पद रिक्त झाले असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर होती.