अमरेश नाईक यांचा उपाध्यक्ष, सचिवपदाचा अर्ज अवैध

जीसीए निवडणूक : आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th September, 12:19 am
अमरेश नाईक यांचा उपाध्यक्ष, सचिवपदाचा अर्ज अवैध

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उपाध्यक्ष आणि सचिव या दोन पदांसाठी अमरेश नाईक यांनी केलेले उमेदवारी अर्ज छाननीवेळी बाद झाले. गुरुवारी, ११ सप्टेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने संध्याकाळपर्यंत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत रोहन गावस देसाई गट आणि चेतन देसाई गट आमने-सामने आहेत. विद्यमान अध्यक्ष विपुल फडके, सूरज लोटलीकार, अकबर मुल्ला आणि विनोद ऊर्फ बाळू फडके हे चेतन देसाई गटासोबत आहेत. तर रोहन गावस देसाई गटाला भाजप समर्थित क्लब्सचा पाठिंबा मिळाल्याचे समजते.
अध्यक्षपदासाठी चेतन देसाई गटातर्फे महेश देसाई, तर रोहन गावस देसाई गटातर्फे महेश कांदोळकर प्रमुख उमेदवार आहेत. गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. संघटनेच्या एकूण १०७ मतदार क्लब्सचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतील.
अध्यक्षपदासाठी ७ उमेदवार
अध्यक्षपदासाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. अनंत नाईक, महेश देसाई, महेश कांदोळकर, परेश फडते, राजेश पाटणेकर, सय्यद माजिद आणि सुदेश राऊत. यांपैकी किमान दोन उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर खरी चुरस स्पष्ट होईल.