उत्तराखंड क्रिकेट संघटनेकडून सरकारी निधीचा गैरवापर : बीसीसीआयला नोटीस
न्यूज डेस्क । गोवन वार्ता
देहरादून : उत्तराखंड उच्च न्यायालयाने मंगळवारी बीसीसीआयला नोटीस बजावली असून, क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंड (सीएयू) वर सरकारी निधीच्या गैरवापराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी १२ कोटींच्या हिशेबात गडबड झाल्याचा आरोप असून, केवळ खेळाडूंच्या अन्नखर्चाच्या नावाखाली मोठा निधी लाटल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या आरोपांनुसार, सीएयूच्या बाह्य चार्टर्ड अकाउंटंटने तयार केलेल्या ऑडिट अहवालात खेळाडूंसाठी ३५ लाखांच्या केळी खरेदीचा खर्च दाखवला आहे.या धक्कादायक तपशिलामुळे गैरव्यवहाराचा संशय बळावला आहे.
ऑडिट अहवालानुसार सीएयूने ६.४ कोटी इव्हेंट मॅनेजमेंट फी, २६.३ कोटी स्पर्धा व निवड चाचणी खर्च दाखवला आहे. मागील वर्षी (२०२४) २२.३ कोटी खर्च झाला होता, म्हणजेच यंदा तब्बल ४ कोटींनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
देहरादूनचे रहिवासी संजय रावत आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती मनोजकुमार तिवारी यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली. याचिकाकर्त्यांनी २०२४-२५ आर्थिक वर्षातील संघटनेच्या हिशेबाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच खेळाडूंसाठी सुविधा उभारण्यासाठी मिळालेला निधी देखील संघटनेने लाटल्याचा गंभीर आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. खेळाडूंना मिळणारे पैसे अन्नखर्चाच्या नावाखाली वळवण्यात आल्याचा दावा आहे.
पुढील सुनावणी उद्या
उच्च न्यायालयाने आरोपांची दखल घेत शुक्रवारी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
दरम्यान, भारतातील घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये दिलीप ट्रॉफी अंतिम सामना गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, मध्य क्षेत्र विरुद्ध दक्षिण क्षेत्र असा सामना रात्री ९.३० वाजता सुरू होईल.