राष्ट्रीय महामार्गावरील मृत म्हशींना बाजूला करणारेच बालंबाल बचावले

अपघातात दोन म्हशी, दोन रेडे ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th September, 11:57 pm
राष्ट्रीय महामार्गावरील मृत म्हशींना बाजूला करणारेच बालंबाल बचावले

काणकोण : भगतवाडा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात दोन गाभण म्हशी व दोन रेडे ठार झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त जनावरे रस्त्याच्या बाजूला काढण्यास गेलेल्या काही युवक तसेच गस्तीवरील पोलिसांना भरधाव आलिशान गाडीने चिरडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे ते सर्वजण बालंबाल बचावले.

चाररस्ता ते कोळसरपर्यंतच्या मनोहर पर्रीकर राष्ट्रीय महामार्गावर भटक्या गुरांमुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे. या एकाच आठवड्यात वाहनांनी ठोकरल्याने ४ म्हशी व २ रेडे ठार होण्याची घटना घडली. तर, शुक्रवारी रात्री भगतवाडा येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोन गाभण म्हशी व दोन रेडे ठार झाले.

शुक्रवारी रात्री भगतवाडा येथे अपघातात म्हशी व रेडे ठार झाल्याची माहिती मिळाल्यावर मंजिल देसाई, गौरव नाईक गावकर, दत्तराज नाईक गावकर, तसेच पोलीस मुकेश शेट व इतरांनी त्या म्हशींना दोरखंड घालून राष्ट्रीय महामार्गावरुन बगल मार्गाच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कारवारहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान गाडीने चिरडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, बालंबाल बचावल्याचे वैभव फळदेसाई यांनी सांगितले.

या रस्त्यावरील काही ठिकाणचे पथदीप पेटत नाहीत. त्यात जनावरे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे अपघात घडतात. आम्ही मृत म्हशी व रेडे बाजूला करीत होतो. मात्र, या मृत म्हशींमुळेच आमचाही जीव धोक्यात आला होता, असे फळदेसाई यांनी सांगितले.

भगतवाडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला हिरवळ व गवत असून हा चारा खाण्यासाठी म्हशी, गुरे येथे येतात. त्यानंतर रस्ता ओलांडून ही जनावरे जात असताना अपघात घडतात. अपघातावर नियंत्रण ठेवण्याकरीता भटक्या गुरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे वैभव फळदेसाई यांनी सांगितले. 

 

हेही वाचा