राज्यात अपघातांचे सत्र, ईडीच्या छापासत्राबरोबरच काही ठिकाणी धार्मिक तणाव
पणजी : म्हापशात ईदच्या रोषणाईवरून तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे वास्कोत मुस्लिम सुमदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एकाला अटक केली. प्रेषित पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मडगावात तक्रार दाखल करण्यात आली. याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी अपघात, ईडीचे छापासत्र सुरूच होते. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
म्हापशात ईदच्या रोषणाईवरून तणाव
एकतानगर, हाऊसिंग बोर्ड येथे ईद-ए-मिलादनिमित्त केलेल्या विद्युत रोषणाईवरून एका हिंदू महिलेने मुस्लिम समुदायाच्या लोकांना शिविगाळ करून अपमानास्पद भाषा वापरली. या प्रकारावरून हिंदू-मुस्लिम समुयांमध्ये वाद झाला. प्रकरण चिघळल्याने शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले. म्हापसा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर महिलेने माफी मागितली आणि प्रकरणावर पडदा पडला.
धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी वास्कोत एकाला अटक
मुस्लिम सुमदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी बसुराज माकपूर याला अटक केली. संशयित दुसरा युवक जुझे इनासियो रॉड्रिग्ज याचा शोध सुरू आहे. माकपूर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोकाट गुरांना चुकवताना हडफडेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
हडफडे येथे रस्त्यावर झुंजणार्या बैलांना चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करत असताना एका बैलाच्या पायाला घासून दुचाकीची समोरून येणार्या कारला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रायन आल्मेदा (४५, सोरांटोवाडो-हणजूण) यांचा मृत्यू झाला.
तळावली घराला आग लागून दोन सिलिंडरचा स्फोट
तळावली येथे घराला आग लागण्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यात दोन सिलिंडरचा स्फोट झाला असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आले तसेच घरातील दोन सिलिंडर बाहेर काढण्यात आले.
सोमवार
प्रेषित पैंगबरांबाबत आक्षेपार्ह विधान, मडगावात तक्रार
ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून जुलूस काढण्यात आला. या जुलूसच्या व्हिडिओवर काहीजणांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत धार्मिक भावना दुखावण्यासारखे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याप्रकरणी तन्झीम इ आला हजरत इमाम अहमत रझा या संस्थेतर्फे मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
जुने गोवा येथे चिरेवाहू ट्रक उलटला
जुने गोवा येथील हिलसिटी येथील उतरणीवर ब्रेक निकामी झाल्यामुळे चिरेवाहू ट्रक उलटला. ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या चालक दीपक लमाणी (वास्को) याला जुने गोवा अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून गोमेकॉत दाखल केले आहे.
लॉरीला आदळून दुचाकी चालकाचा मृत्यू
मोबोर-केळशी येथे हॉटेलबाहेरील रस्त्यावर उभ्या केलेल्या लॉरीला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीचालक लक्ष वाधवा (२२, मूळ रा. जयपूर) याचा मृत्यू झाला. अपघाताचा पंचनामा करून कोलवा पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली आहे.
मंगळवार
ईडीचे बार्देश तालुक्यात छापासत्र
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी बार्देश तालुक्यात छापासत्र आरंभ केले. एका बांधकाम उद्योजकासह स्थानिक पंच आणि एका व्यावसायिकाच्या हणजूण आणि आसगाव येथील एकूण चार ठिकाणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ईडीने स्थानिक पंच आणि एका व्यावसायिकाला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
गोवा विकास पार्टीची याचिका निकालात
गोवा विकास पार्टीला राजकीय पक्ष म्हणून यादीतून वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने मुदतपूर्व याचिका असल्याचे नमूद करून निकालात काढली.
मडगावात बसची दुचाकीला धडक, चालकावर गुन्हा
मडगाव येथील जुन्या बसस्थानकावरून कदंब बसस्थानकाकडे जाताना खासगी बसची धडक दुचाकीला बसली. यात दुचाकीचालक महिलेला दुखापत झाली. चालक रवी तलवार (रा. सां जुझे दि अरियाल) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बुधवार
हणजूण कोमुनिदाद जमीन घोटाळ्यात ईडीकडून ७२ लाख, ७ आलिशान गाड्या, दस्तावेज जप्त
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यात आणि हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. यातून हणजूण कोमुनिदादच्या १२०० कोटींच्या ३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ईडीने यशवंत सावंत व इतरांकडून ७२ लाखांची रोख रक्कम, बीएमडब्ल्यू, पोर्शे केमन, आॅडी, रेंज रोव्हर अशा सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत. ईडीच्या तपासातून गोव्यात बेकायदेशीर जमीन हडप करणारे मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.
युवतीच्या खूनप्रकरणी युवकाची जन्मठेप रद्द, निर्दोष सुटका
काब द राम येथील दीपाली मेहता या २० वर्षीय युवतीच्या खूनप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करून आरोपी विजेंद्र ऊर्फ चेतन आरोंदेकर याची निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. भारती डांगरे आणि न्या. निवेदिता मेहता या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला.
हॉटेलच्या खोलीतून ५.७० लाखांची रोख पळविली; दोघांना अटक
पणजी येथील एका हॉटेलच्या खोलीत ठेवलेली ५.७० लाख रुपयांची रोख रक्कम पळविण्यात आली आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी थुमु रवितेजा (हैदराबाद) आणि अश्रफ शेख (तेलंगणा) या दोघांना अटक केली आहे.
गुरुवार
होंडा पंच दीपक गावकर यांना परप्रांतीयांकडून मारहाण
होंडा येथील पंचायतीचे पंच आणि गावकरवाडा येथील रहिवासी दीपक गावकर यांना गुरुवारी दुपारी दोन परप्रांतीयांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
असोल्डा येथील युवकाला गांजासह अटक
असोल्डा केपे येथील सार्थक नाईक याच्याकडून ८३ ग्रॅम गांजा कुडचडे पोलिसांनी जप्त करून त्याला अटक केली आहे.
शुक्रवार
गैरव्यवहारप्रकरणी वीज खात्यातील दोघांचे निलंबन
ग्राहकांचे बिल भरण्यासाठी घेतलेल्या पैशांतील आठ लाखांहून अधिक महसुलाच्या गैरव्यवहारप्रकरणी आके येथील वीज विभागातील कनिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक यांना निलंबित करण्यात आले आहे.
विदेशी महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार; हेल्थ-वेच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टराला अटक
जुने गोवे येथील हेल्थ-वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एका विदेशी महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. वृषभ दोशी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या बहिणीने जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित डॉक्टरच्या अटकेची कारवाई केली.
शनिवार
क्राँक्रिट मिक्सर ट्रक नदीपात्रात पडला
बाळ्ळी येथे राष्ट्रीय महामार्गावर कामादरम्यान चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने क्राँक्रिट मिक्सर ट्रक नदीपात्रात पडला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.
म्हापशात दुचाकीची चोरी
म्हापसा येथील मुथुट फायनान्स शाखेजवळ पार्क केलेली ऑडिटरच्या मोटारसायकलची चोरी करण्यात आली. चोरीचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
लक्षवेधी
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये डिसेंबर २०२४ पासून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच मृत पावलेल्या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या शरिरात ड्रग्ज आढळले आहे. पाचपैकी हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यामध्ये ड्रग्ज आढळले आहे.
घटनेच्या वेळी एकमेव प्रत्यक्षदर्शी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या उलटतपासणीत विसंगती आढळून आली. इतर साक्षीदारांचे पुरावे, वैद्यकीय पुरावे आरोपीशी जोडलेले नाहीत. शस्त्रावरील, घटनेच्या ठिकाणचे, पीडितेच्या जखमेवरील रक्ताचे नमुने आरोपीशी जुळत असल्याचे पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी इग्नेशियस मिंज (झारखंड) याची सदोष मनुष्यवध प्रकरणातून निर्दोष सुटका केली. हा आदेश न्या. वाल्मिकी मिनिझीस यांनी दिला.
गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आसगाव आणि पर्रा येथील जमीन हडप प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य संशयित राजकुमार मैथी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
बिट्स पिलानीच्या सांकवाळ कॅम्पसमधील विद्यार्थी ऋषी नायर याच्या मृत्यू प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) ‘रेंडॉक्स’ पद्धतीने केलेल्या वैद्यकीय चाचणीत त्याच्या पोटात तीन प्रकारच्या अमली पदार्थांचे अंश सापडले आहेत. या माहितीमुळे प्रकरणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.