ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबरपर्यंत

पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यांत ७ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ३ जागा या गोवा दंत महाविद्यालयात लेक्चरर पदाच्या आहेत. तर एक जागा गोमेकॉमधील टेस्टिंग युनिट प्रमुखाची आहे. विधिमंडळ कामकाज खात्यात अवर सचिव, गोवा कला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक तर सरकारी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाच्या प्रत्येकी एका जागेसाठी भरती होणार आहे. याबाबत अधिक माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व जागांसाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर पर्यंत आहे. दंत महाविद्यालयात लेक्चरर पदाच्या ३ पैकी २ आरक्षित असणार आहेत. यासाठी दंत विज्ञानातील पदव्युत्तर पदवीसह दंत परिषदेकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ४५ पेक्षा अधिक नसावे. यासाठी पे मेट्रिक्स ११ प्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. गोमेकॉमधील टेस्टिंग युनिट प्रमुख या पदासाठी एमडी किंवा फार्मसीमधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
विधिमंडळ कामकाज खात्यात अवर सचिव पदासाठी एक जागा अनारक्षित आहे. यासाठी उमेदवाराकडे कायदा खात्यातील पदवी, केंद्र, राज्य सरकारच्या कायदेशीर बाबीत सात वर्षांचा अनुभव, ४ वर्षे प्रॅक्टिस केली असणे आवश्यक आहे. गोवा कला महाविद्यालयात फाईन आर्टस् विषयातील सहाय्यक प्राध्यापकाच्या पदासाठी प्रथम श्रेणीत पदवी अथवा पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. सरकारी महाविद्यालयात हार्मोनियम विषयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागेसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.
अर्ज शुल्क भरल्यावरच होणार अर्ज ग्राह्य
सर्व पदांसाठी अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल योग्य पद्धतीने लिहिण्याची आवाहन आयोगाने केली आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून आयोगातर्फे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.