बार्देश बाजारच्या निवडणुकीत २० उमेदवारी अर्ज सादर

उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th September, 11:46 pm
बार्देश बाजारच्या निवडणुकीत २० उमेदवारी अर्ज सादर

म्हापसा : सुमारे ३० वर्षांच्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेनंतर, बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तीन प्रमुख गट रिंगणात उतरले असून, आतापर्यंत २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या निवडणुकीसाठी सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक रामेश्वर दाभोळकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सोमवार दि. १५ असून त्यादिवशी सायंकाळी ४ पर्यंत अर्ज म्हापसा उपनिबंधक कार्यालयात निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करायला हवेत.
दि. १६ व दि. १७ रोजी ३ पर्यंत अर्जांची छाननी होईल. दि. १९ ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. दि. २२ रोजी अंतिम उमेदवारी यादी व निवडणूक चिन्ह दिले जाईल. दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत निवडणूक होईल.
दि. ६ रोजी सकाळी १० वा. म्हापसा उपनिबंधक कार्यालयात मतमोजणी होईल व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. दरम्यान, मतदानाचे ठिकाण आणि मतदान केंद्राची व्यवस्था योग्य वेळी कळविली जाईल, असे निर्वाचन अधिकारी दाभोळकर यांनी निवडणूक नोटीसीत नमूद केले आहे.
माजी अध्यक्ष निखिलचंद्र खलप यांच्या गटाचे १३, तर माजी अध्यक्ष धर्मा चोडणकर यांच्या गटाचे ७ अर्ज दाखल झाले आहेत. जयवंत नाईक यांच्या गटाचे अर्ज सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण १४ संचालकपदांसाठी तीन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे.
तीन गटांमध्ये मुख्य लढत
गेली ३० वर्षे बार्देश बाजारचे संचालक मंडळाची निवड प्रवर्तक अ‍ॅड. रमाकांत खलप यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्याने बिनविरोध होत होती. गेल्या वेळीही काही इच्छूक भागधारकांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतरही संचालक मंडळाची निवड वरील पद्धतीने करण्यात आली होती. मात्र, यावेळी माजी अध्यक्ष धर्मा चोडणकर, माजी अध्यक्ष निखिलचंद्र खलप व माजी अध्यक्ष जयवंत नाईक यांनी आपापले गट निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्धार केला आहे. 

हेही वाचा