मडगाव : दिलीप दिग्गा (वय २८, रा. छत्तीसगड) याचा कुंकळ्ळी पॉवरहाऊसनजवळील रेल्वे ट्रॅकवर अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर दमलेल्या पत्नीला बसवण्याचा प्रयत्न करताना नशेत असलेल्या दिलीप याला येणाऱ्या रेल्वेचा अंदाज आला नाही आणि त्याला धडक बसली. या अपघातात दिलीप याचा जागीच मृत्यू झाला.
दिलीप दिग्गा व निली आंचल काजर हे मूळ छत्तीसगड येथील असून कामानिमित्ताने कुंकळ्ळी परिसरात राहत होते. शनिवारी दुपारी दिलीप व निली या दोघाही पतीपत्नीने मद्यपान केले. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवरुन चालत ते जेवण्यासाठी जात होते. पत्नी निली आंचल काजर ही दमल्याने तिने खाली बसण्यासाठी आपणास मदत करण्यास पती दिलीप याला सांगितले. नशेत असलेल्या दिलीप याला पत्नीला खाली बसवण्यासाठी मदत करताना वेगाने येणार्या रेल्वेचा अंदाज आला नाही. रेल्वेने दिलीपला धडक दिली, यात दिलीपचा मृत्यू झाला. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला. कोकण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत.