अतूट श्रद्धेचा धागा... अनंत व्रत

शाळीग्राम व पंचायतन असलेल्या या घराने आपले पावित्र्य धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान कोणतेही अवडंबर न माजवता राखून ठेवलेले आहे हे महत्त्वाचे आहे. श्रद्धेला विज्ञानाची जोड देत, त्यातील अध्यात्मिक तत्वाचे व्रत अंगिकारलेले आहे. कै. पांडुरंग नाटेकर व त्यानंतर त्यांची मुले विष्णू आणि अरविंद, तसेच उदय नाटेकर घरातील सर्व मंडळी अगदी उत्साहाने या व्रतात सामील होतात.

Story: लोकगंध |
3 hours ago
अतूट श्रद्धेचा धागा... अनंत व्रत

जवळपास चारशे वर्षांचा इतिहास असलेले...कुळागराच्या नितळ, शीतल सावलीत वसलेले ते मायेच्या ओलाव्याने भरलेले घर! गेल्या कित्येक वर्षांपासून अनंत व्रताच्या श्रद्धेच्या दोऱ्याने आध्यात्मिक अनुभूतीचे संचित मिरवीत आलेले आहे. आठल्येकर भटांनी कै. अनंत पाध्ये नाटेकर यांच्याकडे हा दोरा सुपूर्द केला आणि मग सुरू झाला या व्रताचा अखंडितपणे प्रवास. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा चौदा गाठीचा दोरा विश्वासाने सोपविला जातो. ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आलेली असते ती व्यक्ती तेवढ्याच आत्मीय श्रद्धेने या व्रताचे पालन करते हे विशेष. यात अजूनपर्यंत कोठे खंड पडलेला नाही. 

डिचोली तालुक्यातील वेळगे सूर्ला हा कुळागरांचा, मुबलक पाणी असलेल्या तलावांचा, डेरेदार वृक्षांचा, डोंगररांगाचा नितांतसुंदर गाव. मुख्य म्हणजे हिंदू-मुसलमान यांच्या धार्मिक सलोख्याचे बंध इथल्या उत्सवांच्या निमित्ताने अनुभवता येतात. अलीकडे खाणींच्या अनिर्बंध उत्खननाच्या विळख्यात सापडून या गावाचे अक्षरशः लचके तोडलेले आहेत. पाध्ये नाटेकरांच्या कुटुंबीयांनी मात्र इथले हिरवे संचित जीवाचे रान करून जतन करून ठेवलेले दिसते. माडा-पोफळीच्या मांदियाळीत वसलेल्या घरात पोहोचण्यासाठी सुरुवातीला सरळवाट तर पुढे छोट्या छोट्या पायऱ्या चढून जावे लागते. आपल्या स्वागताला सज्ज असते ती पाण्याने तुडुंब भरलेली विहीर. पुढे छोटा पूल, त्याखालून खळाळत जाणारा ओहोळ... आजूबाजूला विविध रंगांची, गंधाची फुलझाडे. त्यात उठून दिसतो तो अशोक आणि मग पुढे पायऱ्या चढून अंगणात प्रवेश करतानाच चक्क समोर एखादया पुराण पुरुषासारखे उभे ठाकते घरासारखीच शेकडो वर्षांची परंपरा मिरवणारे मुचकुंदाचे झाड! भलामोठा राकट. काहीश्या ओबडधोबड भासणाऱ्या या वृक्षांची फुले मात्र नाजूक, लोभस, पांढऱ्या नंतर काहीशी फिकट होत जाणारी अशी असतात. मंद गंधित आणि औषधी गुणधर्म असलेले हे झाड या घराचा जणू राखणदार असल्याची खूण वाटते.

अशा या परंपरा मनोभावे जोपासणाऱ्या घरात अनंत व्रताचा वसा आजही तेवढ्याच मनोभावे चालू ठेवलेला अनुभवायला मिळाले, हा अविस्मरणीय क्षण होता. हे व्रत करताना ‘दर्भ’ एक विशिष्ट प्रकारचे नदीकाठी उगविणारे गवत ज्याला ‘ल्हवो’, लवो, लव असेही म्हटले जाते. आदिवासी लोक यापासून चटया विणतात. धार्मिक विधीत सुध्दा या गवताचा वापर केला जातो. तर या दर्भापासून सात फणांचा शेषनाग करून त्याची पूजा केली जाते. हा नाग सुध्दा एखादी विशेष व्यक्तीच करते. पूर्वी या कुटुंबीयांसाठी निळकंठ जावडेकर पुरोहित नाग करायचे. आता सावंतवाडी येथे गणपुलेंकडून आणला जातो. व्रताची सांगता झाली की त्याचा विधिवत सांभाळ करून पुढील वर्षांसाठी सांभाळून ठेवला जातो. व्यवस्थित असेपर्यंत त्याच शेषाचे पूजन केले जाते. या व्रताचे पालन करताना चौदा आकड्याला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या संस्कृती मध्येही चौदा या संख्येला, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक संदर्भ लाभलेले आहेत. चौदा गाठींचा रेशमी दोरा. साखळीच्या पटवी मुसलमान व्यक्तीकडून तो आणला जातो. फोंडा तालुक्यातील अंतरुज महालात सावईवेरे येथील अनंत देवाची मूर्ती मुसलमान व्यापाऱ्याच्या जहाजातून आलेली होती अशी कथा आहे. ती कथा आणि हा दोरा याचा काही संदर्भ असेल की नाही हे काही निश्चित सांगता येत नाही. चौदा गाठींच्या दोऱ्याची पूजा जोडप्याने मिळून करायची अशी परंपरा आहे. त्यासाठी मुख्य चार नैवेद्य दाखवले जातात. जुन्या दोऱ्याचा, नागाचा, हवा म्हणजेच पवन देव व गंगा-कलश पूजन असे नैवेद्य असतात. पूजा करण्यापूर्वी जोडप्याने हातात दोरा बांधावा लागतो. पूजेसाठी चौदा प्रकारची पत्री, पाने, तसेच चौदा प्रकारची फुले यांचा वापर करण्यात येतो. अशी माहिती आताचे पुरोहित विजय जावडेकर यांनी दिली. अर्जुन, पळस, औदुंबर, पिंपळ, मका, जटा मावशी, कवठी, कर्दळी, आघाडा, कण्हेर, कुंड, उंडल, नागवली (खायची पाने), तुळस, चौदा फुले-कमळ (पदम), जाई, चाफा, कान्द्रेकमळ (पांढरे), केवडा, बकुळ, धोतरा, मोगरा, जुई, गणेरिका, शत पाकळी कमळ, उंडल फूल, पारिजातक, कण्हेर फूल अशी फुले वापरतात.

पूर्वी पानात वाढण्यासाठी चौदा प्रकारचे गोड पदार्थ केले जायचे. त्यात पुरुषवाचक पदार्थच असायला हवेत असा दंडक होता. आजही याचे पालन केले जाते मात्र यातील बऱ्याच पदार्थांची नावे कालौघात विस्मृतीत गेलेली आहेत. अनारसे, चवडा, मोदक, लाडू,  खाजा,  घारगे,  शिरा,  साखरभात अशा काही नव्या जुन्याच संगम जाणवतो.  पावसाळी रानभाज्या जेवणात असायच्या. त्याचीही ओळख आता क्षीण झालेली आहे.  विष्णू पाध्ये नाटेकर यांच्या मातोश्री रुक्मिणी यांनी जी भाज्यांची माहिती दिली त्याप्रमाणे आंबाडा, चुरणाच्या पानांची,  फुलांची,  भोपळ्याची पाने, कुडडुक,  आकुर,  तांबडी,  धवी,  तायकिळो,  वावूळ,  फागला,  लुतिची,  दुधाळू,  आळू इत्यादी नावे सांगताना अलीकडे या सर्व विधींचे साग्रसंगीत करण्यासाठीचा वेळ सर्वांना आपल्याला वाढत्या व्यापामुळे,  तसा कमीच मिळतो म्हणून खतखते सारखा पारंपरिक पदार्थ करून त्यातच शास्त्राच्या चौदा भाज्यांचा प्रतिकात्मक वापर केला जातो.

खरंतर हे व्रत आजच्या काळातही तेवढ्याच श्रद्धेने करणे हेच मुळी खूप कठीण काम आहे.  चौदा दांपत्ये,  कुमारिका, कुमार  यांना जेवण वाढून त्यांचा नारळ,, तांदूळ,, गोड-धोड देऊन सन्मान करीत दोऱ्याचे उद्यापन करणे,  दरवर्षी नवीन दोऱ्याची पूजा करणे,  चौदा जिन्नस घालून ब्राह्मणाला वाण देणे,  देवाचे वाण पुरोहिताला देणे, पूजा झाल्यावर यथासांग व्रताची कथा सांगणे,  ती ऐकणे;  त्याशिवाय येणारे जाणारे,  पै पाहुणे,  नवस आंगवणी करणारे,  सासुरवाशिणी मुली,  ओळखीचे हा सगळा एक मोठा वसा आणि वारसा आहे.  तो पाध्ये नाटेकर कुटुंबीय आजही तेवढ्याच उत्साहाने,  एकोप्याने आणि महत्त्वाचे म्हणजे मनःपूर्वक सांभाळीत आहेत.  साहित्यिक ह.  मो.  मराठे यांच्या बालकांडमध्ये या घराची माळी-अजरामर झालेली आहे.

शाळीग्राम व पंचायतन असलेल्या या घराने आपले पावित्र्य धार्मिक,  सांस्कृतिक अधिष्ठान कोणतेही अवडंबर न माजवता राखून ठेवलेले आहे  हे महत्त्वाचे आहे.  श्रद्धेला विज्ञानाची जोड देत,  त्यातील आध्यात्मिक तत्त्वाचे व्रत अंगिकारलेले आहे. कै. पांडुरंग नाटेकर व त्यानंतर त्यांची मुले विष्णू आणि अरविंद  तसेच उदय नाटेकर घरातील सर्व मंडळी अगदी उत्साहाने या व्रतात सामील होतात.  हे आजच्या काळात उल्लेखनीय आहे.  निसर्गाच्या कुशीत वावरताना त्याच्याकडूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली असावी.  जे आहे ते फक्त निसर्गाचे... त्या परमतत्त्वाचे आम्ही फक्त भारवाही... ही निसंग वृत्तीच त्यांनी घेतलेल्या अनंत व्रताचा वसा आणि त्याचा वारसा जपून तो टिकवून ठेवत वाटचाल करण्याची ऊर्मी त्यांना लाभलेली आहे.


पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)