विशेष ग्रामसभेत सरपंच केवळ अर्थसंकल्पावरच चर्चा करण्याबाबत ठाम राहिल्यामुळे नागरिक नाराज
मडगाव : माजोर्डा-उत्तोर्डा-कलाटाची विशेष ग्रामसभा रविवारी सरपंच अँथिया लिन परेरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, मात्र उर्वरित विकासकामांवर चर्चा करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली. विशेष ग्रामसभा असल्याने अर्थसंकल्पावरच चर्चा होणार असल्याचे सरपंचांनी सांगताच निम्म्याहून अधिक नागरिकांनी ग्रामसभा अर्धवट सोडली. त्यानंतर उर्वरित ग्रामस्थांच्या उपस्थितीत यंदाचा अर्थसंकल्प संमत करण्यात आला.
ग्रामसभेच्या सुरुवातीलाच काही नागरिकांनी ग्रामसभेत गावातील इतर समस्यांवर चर्चा का केली जात नाही, असा आक्षेप घेतला. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यावर उपाय काढण्यासाठी नियमित ग्रामसभा घेण्याची गरज असताना पंचायत सदस्य एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीच्या चार ग्रामसभा रद्द झाल्यामुळे ग्रामस्थांमधील नाराजी अधिक वाढली होती.
यावर सरपंच अँथिया लिन परेरा यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ही विशेष ग्रामसभा फक्त अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बोलावली आहे. मागील चार महिन्यांपासून कचरा संकलनाचे पैसे देणे बाकी आहे आणि इतरही खर्च थांबलेले आहेत. त्यामुळे लोकांच्या सुविधेसाठीच हा अर्थसंकल्प संमत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅड. राधाराव ग्रॅसिअस आणि नेली रॉड्रिग्ज यांच्यासारख्या काही नागरिकांनीही सरपंचांच्या भूमिकेला पाठिंबा देत इतर विषय पुढील ग्रामसभेत चर्चेला घेण्याची सूचना केली.
मात्र, सरपंचांनी आपली भूमिका कायम ठेवताच सचिवांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. यामुळे नाराज झालेले निम्म्याहून अधिक नागरिक सभागृहातून बाहेर गेले. त्यानंतर उपस्थित राहिलेल्या काही लोकांनी विचारलेल्या शंकांवर उत्तरे दिल्यानंतर सरपंच अँथिया लिन परेरा यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे जाहीर केले.