सां जुझे दी अरीयाल ग्रामसभेत स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी प्रकरणाचे पडसाद; आमदार क्रुझ सिल्वा यांचा न्यायालयीन लढाईला पाठिंबा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
55 mins ago
सां जुझे दी अरीयाल ग्रामसभेत स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

मडगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणी प्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी स्थानिकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी सां जुझे दी अरीयाल येथील ग्रामसभेत नागरिकांनी केली. यावेळी हातात काळे कापड आणि निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.

गेल्या वर्षी सां जुझे दी अरीयाल येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जात असताना, नागरिकांनी त्याला विरोध केला होता. रस्ता नसताना दुसऱ्यांच्या खासगी मालमत्तेतून मार्ग काढून हा प्रकार केवळ जमीन हडपण्यासाठी सुरू असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी सां जुझे दी अरीयाल आणि इतर भागांतील २७ जणांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याचे पडसाद रविवारी झालेल्या ग्रामसभेत उमटले, ज्यात आमदार क्रुझ सिल्वा यांचीही उपस्थिती होती.

यावेळी पीटर व्हिएगस यांनी सांगितले की, स्थानिकांनी पुतळ्याला नव्हे, तर तो उभारण्याच्या बेकायदेशीर पद्धतीला विरोध केला होता. सदर जमिनीकडे जाण्यास वाट नसतानाही ते केले जात होते. तरीही पोलिसांनी स्थानिक आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करून त्यांची सतावणूक करण्याचा प्रयत्न केला. सरकारने वारंवार हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तसे झालेले नाही. फ्रेडी ट्राव्हासो यांनीही याला दुजोरा देत म्हटले की, स्थानिकांनी हे आंदोलन केवळ जमिनी वाचवण्यासाठी केले होते, त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. त्यामुळे आता पंचायत आणि आमदारांनी विविध स्तरांवर प्रयत्न करून हे गुन्हे मागे घ्यावेत.

यावर आमदार क्रुझ सिल्वा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर स्तरावर केलेली होती. मात्र, हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने यावर जास्त बोलता येणार नाही. तरीही, स्थानिकांच्या न्यायालयीन लढाईसाठी आपला पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर उपस्थितांनी काळे कापड  आणि सरकारविरोधी फलक हाती घेत निषेध नोंदवला व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.