युपी : दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून केली बेल्टने बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू

रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; गोव्यातील जुना वाद ठरला हत्येचे कारण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
युपी : दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून केली बेल्टने बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू

देवरिया : एका थप्पडीचा सूड घेण्यासाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे झालेल्या या खुनाचे धागेदोरे थेट गोव्यातील एका जुन्या वादाशी जोडले गेले आहेत. देवरियातील खामपार पोलीस स्थानकाच्या हद्दीत रमेश प्रसाद या तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करत या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

मृत रमेश आणि मुख्य आरोपी शैलेश प्रसाद हे दोघेही काही महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये एकाच ठिकाणी मजुरीचे काम करत होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि रागाच्या भरात रमेशने शैलेशच्या कानशिलात एक थप्पड लगावली. याच एका थप्पडीचा सूड घेण्यासाठी शैलेशने आपल्या तीन साथीदारांसह मिळून रमेशचा खून करण्याचा कट रचला अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.

१० सप्टेंबर रोजी आरोपींनी रमेशला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले आणि बेल्ट तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह जवळच्या मक्याच्या शेतात फेकून दिला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी तीन आरोपींना अटक केली असून, मारहाणीसाठी वापरलेला दांडा व बेल्टही जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर या गुन्ह्यात सहभागी असलेला एक आरोपी अद्याप फरार आहे अशी माहिती खामपार पोलीस स्थानकाचे प्रमुख दिग्विजय सिंग यांनी दिली. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा