‘ओंकार’ अखेर गोव्यात; मोपात वनखात्याचा सापळा

कळपापासून भरकटलेला हत्ती; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
‘ओंकार’ अखेर गोव्यात; मोपात वनखात्याचा सापळा

पणजी : महाराष्ट्राच्या सीमेवरून गोव्याच्या हद्दीत शिरलेल्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला पकडण्यासाठी वनखात्याने मोपा येथील वनक्षेत्रात सापळा रचण्यास सुरुवात केली आहे. कळपापासून भरकटलेला हा हत्ती बिथरलेला असून, त्याला लवकरच पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सकाळी हत्ती महाराष्ट्रातच असल्याचे सांगणाऱ्या वन विभागाने आता तो गोव्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

यापूर्वी आज सकाळी, मुख्य वन संरक्षक नवीन कुमार यांनी हत्तीने तेरेखोल नदी ओलांडली नसल्याने तो महाराष्ट्राच्याच हद्दीत असल्याचे स्पष्ट केले होते. गोव्याचे वन पथक महाराष्ट्र वन विभागाच्या संपर्कात असून, हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले होते. कळपापासून चुकलेला हा हत्ती बिथरलेला असल्याने कोणतीही घाईची कृती धोकादायक ठरू शकते, असेही ते म्हणाले होते.

अफवांवर विश्वास ठेवू नका

मुख्य वन संरक्षक नवीन कुमार यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, मात्र घाबरून न जाण्याचा सल्लाही दिला आहे. लोकांनी केवळ शक्यता आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. हत्ती दिसल्यास किंवा त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित वन विभागाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.