सपा नेत्या डिंपल यादव यांच्यासह १५१ प्रवाशांचा जीव वाचला
लखनौ: दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी लखनऊ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला. या विमानात समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यासह एकूण १५१ प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विमान धावपट्टीवरून वेगाने जात असताना अचानक विमानातून आवाज येऊ लागला. त्यामुळे विमानाला आवश्यक वेग मिळू शकला नाही. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे, विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याआधीच थांबवण्यात आले. यामुळे एक मोठा अपघात टळला.
विमानात तांत्रिक बिघाड किंवा इंजिनची समस्या असावी. प्रवासी खूप घाबरले होते, पण वैमानिकाने अतिशय धैर्य आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही, असे सपा नेते सूरज सिंग यांनी सांगितले
अपघाताची शक्यता टळल्याने विमानतळ प्रशासनाने तातडीने धावपट्टीची पाहणी केली आणि सुरक्षा प्रोटोकॉल लागू केले. प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे इंडिगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून सांगितले. कंपनीने बाधित प्रवाशांना दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याचा किंवा पूर्ण परतावा देण्याचा पर्याय दिला आहे. या घटनेची चौकशी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) द्वारे केली जात आहे.