वाहतुकीसाठी वापरलेली वाहणेही घेतली ताब्यात

फोंडा : कर्नाटकातून गोव्यात बेकायदेशीररित्या आणि एफडीएद्वारे निर्धारित कोणतेही नियम न पाळता आणले जाणारे तब्बल १३१० किलो चिकन अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले आहे. या कारवाईत दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
सविस्तर माहितीनुसार, रविवारी सकाळपासून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कर्नाटकातून येणाऱ्या खाद्यान्न वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली होती. मांस-मटणाच्या वाहतूक करणाऱ्या एकूण २५ गाड्या तपासण्यात आल्या. या तपासणीदरम्यान, केए-६३ ए-२९४६ या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये ७०० किलो चिकन आढळले, ज्याची किंमत १ लाख ३० हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे, केए-६३-३०६९ या दुसऱ्या वाहनात ६१० किलो चिकन सापडले, ज्याची किंमत ४३ हजार रुपये आहे.
मांस आणि मासे यांची वाहतूक करताना आरोग्याच्या दृष्टीने काही विशिष्ट नियमांचे पालन करणे बंधनकारक असते, मात्र या दोन्ही वाहनांमध्ये या नियमांची पायमल्ली करण्यात आली होती. मानवी आरोग्याला हानिकारक ठरू शकेल अशा पद्धतीने या चिकनची वाहतूक केली जात होती, असे प्रशासनाने सांगितले. मानवी आरोग्याच्या सुरक्षेसाठी जप्त केलेल्या या सर्व चिकनची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संज्योत कुडाळकर, राजाराम पाटील, शैलेश शेणवी आणि अतुल देसाई या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.