पणजी : गोव्यातील कोमुनिदाद जमिनींवरील घरे आणि बांधकामे अधिकृत करण्याच्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील दोन कोमुनिदादींनी आमसभा बोलावल्या आहेत. थिवी आणि आसगाव कोमुनिदादीची आमसभा २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या संदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोमुनिदाद जमिनींवरील बेकायदेशीर घरे आणि बांधकामे अधिकृत केल्यास होणाऱ्या परिणामांवर सदस्यांमध्ये विचारविनिमय केला जाईल.
२८ फेब्रुवारी २०१४ पूर्वीची अनधिकृत घरे किंवा बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला होता, तरीही सरकारने ते संमत केले. या विधेयकाला मान्यता देऊ नये, अशी मागणी करत कोमुनिदाद समितीच्या सदस्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. मात्र, निवेदन दिल्यानंतरही राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी या विधेयकाला मान्यता दिली, ज्यामुळे कोमुनिदाद जमिनीवरील अनधिकृत घरे अधिकृत करण्याचा कायदा अस्तित्वात आला.
या कायद्याला काही कोमुनिदादींनी पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे थिवी आणि आसगाव कोमुनिदादीच्या या आमसभेत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.