मडगाव: मुगाळी-सां जुझे दी अरीयाल येथे दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मोनिका सिल्वा (७८) या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी दुचाकीचालक सुनील तलवार याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी मुगाळी येथील भगवती टाईल्सजवळ हा अपघात घडला होता. मुगाळी येथील रहिवासी असलेल्या मोनिका सिल्वा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
उपचारासाठी त्यांना तात्काळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी दुचाकीचालक सुनील तलवार विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.