नंदूरबार : महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बिलाडी गावातील ७६ वर्षीय निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र निकुम यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी समर्पित केले. आपल्या गावासाठी देणगी म्हणून शवपेटी आणि मृतदेह वाहून नेण्यासाठी लागणारी तिरडी सुपूर्द केली. हे साधे पण अनमोल देणे गावकऱ्यांच्या जीवनात एक सुरक्षा आणि आदराचा अनुभव देणार होते. कारण ग्रामीण भागात मृतदेहाची योग्य सेवा न मिळाल्याने अनेकांना अंत्यदर्शनापासून वंचित राहावे लागते.
बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी ही देणगी गावकऱ्यांच्या हाती दिली. सोशल मीडियाच्या गटांवर कौतुकाच्या शुभेच्छा येत होत्या. प्रत्येक पोस्टमध्ये त्यांच्या जीवनाच्या महान कार्याचा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचा आदर दिसत होता.
पण जीवनाची गती अनेकदा अनपेक्षित असते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यूची वार्ता सोशल मीडिया गटांमध्ये पसरली आणि अवघ्या सहा तासांपूर्वी त्यांनी सुपूर्द केलेल्या शवपेटीतच त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला.
आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकाने अंतिम क्षणी स्वतःच्या जीवनातून समाजसेवेचा धडा दिला. त्यांच्या कार्याचा आदर, त्यांची माणुसकी आणि समाजासाठी असलेली निस्वार्थ भावना यांचा प्रत्यय गावकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या रूपात दिसत होता.
रामचंद्र निकुम यांचे जीवन हे केवळ शिक्षण देणे नाही, तर समाजासाठी बांधिलकी आणि सेवाभाव जपण्याचे उदाहरण बनून गेले.