
नवी दिल्ली : देशात कडक कायदे असूनही नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अजूनही थांबलेला नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालादरम्यान म्हटले आहे. पुरुषांची मानसिकता अजूनही बदललेली नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने, 'एक महिला घर असो वा ऑफिस, नेहमीच भीती, शिष्टाचार आणि माफी यांच्यात गुरफटून जगत असते', असे म्हटले.
जम्मू-काश्मीरमधील एका सरकारी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप असलेल्या एका खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी हे निरीक्षण नोंदवले. त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या एका कवितेचा उल्लेख करत, महिलांचे आयुष्य कसे असते हे सांगितले. 'माझी भीती, माझा शिष्टाचार आणि शेवटी माझी माफी... माझी भीती तुमच्या रागाची आहे, माझा शिष्टाचार माझे कर्तव्य आहे, आणि माझी माफी तुमच्यासाठी आहे', अशा शब्दांत त्यांनी महिलांची व्यथा मांडली.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी आसिफ हमीद खान यांच्याशी संबंधित आहे. २०१४ मध्ये एका महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि धमकावल्याची तक्रार दाखल केली होती. आसिफ खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दावा केला होता की, विभागीय चौकशीत त्यांना या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे आणि पोलिसांनीही 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. त्यामुळे, ट्रायल कोर्टाने त्यांना दिलेले समन्स रद्द करावे, अशी त्यांची मागणी होती.
मात्र, न्यायालयाने आसिफ खान यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने या प्रकरणात चार महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या:
१) केवळ विभागीय चौकशीत निर्दोष मुक्त होणे, हे एफआयआरमधून सूट मिळण्याचे कारण असू शकत नाही.
२) ट्रायल कोर्टाने 'क्लोजर रिपोर्ट' फेटाळून लावत सुनावणी सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.
३) हे प्रकरण समाजाचा आरसा आहे, जिथे महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची भाषा केली जाते, पण प्रत्यक्षात मानसिकता अजूनही जुनीच आहे.
४) उच्चशिक्षित आणि उच्च सरकारी पदावर असलेल्या महिलांनाही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागते, हे या प्रकरणातून दिसून येते.
या निकालामुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.