युवा म्हणाले- ही सर्व संधीसाधू आणि अराजक घटकांची कृत्ये! आंदोलनाला बदनाम करण्याचे काम
काठमांडू : सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. ठिकठिकाणी जाळपोळ, लुटालूट आणि तोडफोड सुरू झाल्याने अखेर नेपाळी लष्कराने मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून, ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
सरकारविरोधात सुरू असलेल्या या निदर्शनांनी गेल्या काही दिवसांपासून हिंसक रूप धारण केले आहे. आंदोलकांनी आतापर्यंत अनेक सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी सायंकाळी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला आग लावली, ज्यात सुमारे २५ हजार महत्त्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स जळून खाक झाल्या. तसेच, मुख्य न्यायाधीशांचे आणि मुख्य रजिस्ट्रारचे कार्यालयही पेटवून देण्यात आले.
यासोबतच, देशातील तीन माजी पंतप्रधानांची घरेही जाळण्यात आली. माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली, तर त्यांच्या घराशेजारील परिसरामध्ये जाळलेल्या नोटांचे बंडल सापडले आहेत. माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घरातील आगीत त्यांची पत्नी गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोखरा येथे एका कार शोरूमला लावलेल्या आगीत एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या आणखी वाढली आहे.
या वाढत्या हिंसाचाराला तोंड देण्यासाठी लष्कराने २७ उपद्रवींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३३.७ लाख रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच, नवलपरासी आणि दिल्ली बाजार येथील तुरुंगांमधून ५०० हून अधिक कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्यात अनेक कैदी यशस्वी झाल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 'जनरेशन-झी' (Gen-Z) गटांनी या हिंसाचारापासून स्वतःला वेगळे ठेवले आहे. 'हा संपूर्ण हिंसाचार काही संधीसाधू लोकांचे कृत्य असून, आमच्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे', असे त्यांनी म्हटले आहे. या भयंकर परिस्थितीमुळे नेपाळचे राजकारण अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले असून, देशात लष्करी राजवट येण्याची किंवा राजेशाहीला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.