फोंडा मारहाणप्रकरणी गुन्हा नोंद; पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांचे स्पष्टीकरण
मडगाव : फोंडा येथील अंत्रुजनगर येथे श्रेयस हर्डीकर (२७) या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर कृत्य किंवा गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे सांगत कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी स्पष्ट केले.
अंथ्रुज नगर येथील श्रेयस हर्डीकर याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही, अशी तक्रार सुरुवातीला करण्यात आली होती. यावर आता पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर फोंडा पोलिसांनी तक्रारीतील मजकूर आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे संशयित विनोद (रा. अंत्रुजनगर, फोंडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.४० वाजता ही घटना घडली असून, विनोद याने लाकडी दांड्याने तक्रारदाराच्या मानेवर हल्ला केला, त्याचा मोबाईलही फोडला आणि शिवीगाळ केली. यात तक्रारदाराला किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेला अपमान, धोकादायक साधनांनी दुखापत करणे आणि गुन्हेगारी बळाचा वापर करणे, अशा कलमांखाली गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांकडून होणारी कोणतीही बेकायदेशीर कृत्ये, गैरवर्तन किंवा कर्तव्यात कसूर सहन केली जाणार नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी आढळणाऱ्या पोलीस दलातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल. गोवा पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच पारदर्शकता आणि जबाबदारीद्वारे जनतेचा विश्वास कायम राखेल, असेही त्यांनी म्हटले आहे.